मित्राला ठार करुन शेतात गाडलं, नंतर कुटुंबाकडे मागितले 6 कोटी; पोलिसांनी तिघांना गोळ्या घालून...

ग्रेटर नोएडा येथे एका खासगी विद्यापीठातील विद्यार्थी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी अखेर त्याचा शोध लावला आहे. मित्रांनीच त्याची हत्या करुन शेतात गाडलं होतं. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 29, 2024, 12:26 PM IST
मित्राला ठार करुन शेतात गाडलं, नंतर कुटुंबाकडे मागितले 6 कोटी; पोलिसांनी तिघांना गोळ्या घालून...  title=

नोएडामध्ये एका बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेताना पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. एका खासगी विद्यापीठात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याची त्याच्याच चार मित्रांनी हत्या केली होती. यानंतर त्यांनी तो मृतदेह शेतात गाडला होता. हत्या केल्यानंतर कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी अपहरणाचा बनाव करत, खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, एकजण फरार आहे. अटक करताना झालेल्या चकमकीत तिन्ही आरोपी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना आरोपींकडे बेकायदेशीर गावठी बंदुका, काडतूसं आणि एक दुचाकी सापडली आहे. 

अमरोहाचे व्यापारी दीपक मित्तल यांचा मुलगा यश मित्तल ग्रेटर नोएडाच्या बेनेट युनिव्हर्सिटीत बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकत होता. 26 फेब्रुवारीला तो अचानक बेपत्ता झाला होता. यानंतर दीपक मित्तल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्या मुलाचं अपहरण करण्यात आलं असून, मोबाईलवर खंडणी मागणारे मेसेज येत आहेत. अपहरणकर्त्यांनी मुलाची सुटका करण्यासाठी 6 कोटींची मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. 

यानंतर पोलिसांनी तपास सुरु करत वेगवेगळी पथकं तयार केली. पोलिसांनी कॅम्पसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी 26 फेब्रुवारीला यश मोबाईलवर बोलत युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडत असल्याचं दिसलं. फोनवर बोलतच तो आपल्या मर्जीने एका गाडीत जाऊन बसला होता. यानंतर पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता पोलीस त्याचा मित्र रचितपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता यश नेहमी रचित, शिवम, सुशांत आणि शुभम यांच्यासह असायचा अशी माहिती मिळाली. 

"26 फेब्रुवारीला या सर्वांनी यशला फोन करुन उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील एका शेतात पार्टी करण्यासाठी बोलावलं होतं. यानंतर यश  शिवम, सुशांत आणि शुभम यांच्यासह पार्टीला गेला होता. पार्टीत त्यांच्यात वाद झाला. यानंतर त्यांनी यशची गळा दाबून हत्या केली आणि शेतातच गाडलं. रचितने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही मृतदेह मिळवला आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी साद मियाँ खान यांनी दिली आहे. 

पोलिसांनी दादरी येथून इतर आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता चकमकीनंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. आम्ही तीन आरोपींना अटक केली असून, शुभम फरार आहे. आम्ही लवकर त्याला पकडू असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

आरोपीने पोलिसांना आपण दिशाभूल करण्यासाठी यशच्या कुटुंबाला मेसेज पाठवले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान यशच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे.