नवी दिल्ली : 7th Pay Commission: तुम्ही स्वत: किंवा तुमच्या कुटूंबात कोणीही केंद्र सरकारचे कर्मचारी असल्यास त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी त्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. जे फिटमेंट फॅक्टरमधील बदलाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ऑगस्टमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. ऑगस्ट महिन्यात ते 3.68 पट वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टरची मोठी भूमिका असते. जास्त फिटमेंट फॅक्टर म्हणजे तुमचा पगारही जास्त असेल. कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वाढवले जाते.
फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 वर वाढवल्यास, किमान मूळ वेतन 18 हजार वरून 26 हजार रुपये होईल. मूळ पगारात आठ हजार रुपयांची वाढ झाल्यास त्याचा इतर भत्त्यांवरही परिणाम होईल. म्हणजेच फिटमेंट फॅक्टर वाढल्याने तुमच्या संपूर्ण पगारावर परिणाम होईल.
यापूर्वी 2017 मध्ये सरकारने मूळ वेतनात वाढ करून एंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांना खूश केले होते. मात्र त्यानंतर त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतन 18 हजार रुपये, तर कमाल वेतन 66,900 रुपये आहे.