भुकेने व्याकुळ झालेल्या ७ हत्तींचा शॉक लागून मृत्यू

जंगलातील जवळपास १३ हत्तींचा कळप कमलांगा गावाच्या परिरसरात भटकत होता.

Updated: Oct 27, 2018, 11:44 AM IST
भुकेने व्याकुळ झालेल्या ७ हत्तींचा शॉक लागून मृत्यू title=

धेनकनाल: ओडिशातील धेनकनाल जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सात हत्तींचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एकाचवेळी इतके हत्ती मृत पावल्याने वनखात्याकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. 

स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जंगलातील जवळपास १३ हत्तींचा कळप कमलांगा गावाच्या परिरसरात भटकत होता. याठिकाणी रेल्वे खात्याकडून ट्रॅक टाकण्याचे काम सुरु आहे. येथील वीज पुरवठ्यासाठी वापरण्यात येणारी वीजेची तार जमिनीवरच पडून होती. हत्तींचा कळप या वायरच्या संपर्कात आल्याने त्यांना वीजेचा जोरदार झटका बसला. यामध्ये सात हत्तींचा जागीच मृत्यू झाला. 

आज सकाळी गावकऱ्यांना हत्तींचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर याची माहिती वनविभागाला कळण्यात आली. 

स्थानिकांनी हत्तींच्या मृत्यूसाठी रेल्वे खात्याला जबाबदार धरले आहे. धेनकनाल परिसर हत्तींसाठी राखून ठेवण्यात आला आहे. अशावेळी रेल्वेकडून योग्य ती काळजी का घेण्यात आली नाही, असा सवाल वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.