देशात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासांत ६९,८७८ नव्या रुग्णांची नोंद

रुग्णांच्या संख्येत सतत वाढ

Updated: Aug 22, 2020, 10:26 AM IST
देशात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासांत ६९,८७८ नव्या रुग्णांची नोंद title=

नवी दिल्ली : अनेक सक्तीचे नियम लागू केल्यानंतर देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचं चित्र समोर येत आहे,. गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार ८७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याचप्रमाणे ९४५ रुग्णांचा या धोकादायक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. मात्र, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या विळख्यातून बाहर येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. 

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २९ लाख ७५ हजार ७०२ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ९७ हजार ३३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत २२ लाख २२ हजार ५७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ५५ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

दरम्यान, रोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० हजारापर्यंत मर्यादित होता. मात्र, काल आणि आज नव्या रुग्णांच्या आकड्याने पुन्हा एकदा ६५ हजारांची वेस ओलांडली आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४ लाख ७० हजार ८७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.