50 वऱ्हाडी, 100 पाहुणे, 10 पदार्थ अन्... लग्नातील वायफळ खर्च टाळण्यासाठी मोदी सरकार आणणार कायदा?

Wasteful Wedding Expenses Bill: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. याच अधिवेशनामध्ये लग्नातील खर्चावर निर्बंध घालण्यासंदर्भातील एक विधेयक मांडण्यात आलं आहे. विधेयक मांडणाऱ्या खासदाराने हे का मांडलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 7, 2023, 04:30 PM IST
50 वऱ्हाडी, 100 पाहुणे, 10 पदार्थ अन्... लग्नातील वायफळ खर्च टाळण्यासाठी मोदी सरकार आणणार कायदा? title=
लग्नामधील वायफळ खर्च थांबवण्यासाठी विधेयक

Wasteful Wedding Expenses Bill: क्राँग्रेसच्या एका खासदाराने संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडलं आहे. या विधेयकामध्ये लग्नांवर होणाऱ्या खर्चांवर निर्बंधन घालण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये एक प्रायव्हेट मेंबर बिल म्हणजेच खासगी सदस्य विधेयक सादर केलं. या विधेयकामधील तरतुदीनुसार वरातीमध्ये केवळ 50 लोकांना सहभागी होण्याची परवानगी असेल. तसेच लग्नाच्या जेवणात 10 पदार्थांहून अधिक पदार्थ नसतील. तसेच लग्नात भेट देण्यात येणाऱ्या वस्तूंची किंमतही 2500 रुपयांपेक्षा अधिक नसावी अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

खर्च टाळण्याचा हेतू

काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल यांनी लोकसभेमध्ये 4 ऑगस्ट रोजी 'विशेष कार्यक्रम होणारा वायफळ खर्च थांबवण्यासंदर्भातील विधेयक 2020' सादर केलं. संसदेमध्ये भाषण करताना त्यांनी, "या विधेयकाचा हेतू वंचित आणि आधार नसलेल्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदलण घडवण्याच्या उद्देशाने लग्नसोहळे आणि कार्यक्रमांसाठी होणारा खर्च टाळण्याचा आहे," असं सांगितलं. वरातील किती लोक असावेत याचाही उल्लेख या विधेयकामध्ये असल्याचं काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल यांनी ट्वीट करुन सांगितलं.

अनिष्ठ प्रथांविरोधात लढा

अशा विशेष कार्यक्रमांच्या वेळी जेवणात वाढल्या जाणाऱ्या पदार्थांच्या संख्येवरही बंधनं घालण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये मांडण्यात आला आहे. लग्नातील कार्यक्रमांमध्ये 10 पदार्थांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तसेच विशेष कार्यक्रमांदरम्यान करण्यात येणाऱ्या देवाण-घेवाणीच्या भेटवस्तूंच्या किंमतीवरही बंधनं घालण्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे. भेटवस्तूंची किंमत 2500 पर्यंत असावी असं यात नमूद केलं आहे. तसेच भ्रूण हत्या, लिंगनिदान यासारख्या समाजाच्या दृष्टीने अनिष्ठ प्रथांविरोधात लढण्यासाठी योगदान देण्यासंदर्भातील तरतुदीही आहेत. 

...म्हणून हवा कायदा

पंजाबमधील खडूर साहिब येथील खासदार असलेल्या जसबीर सिंग गिल यांनी वधूच्या कुटुंबियांवर आर्थिक भार टाकणारी खर्चिक लग्नांची प्रथा बंद करण्याच्या हेतूने हे विधेयक मांडल्याचं सांगितलं जात आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'मधील वृत्तानुसार, लोक स्वत:ची संपत्ती विकून मोठ्या थाटामाटात लग्न करण्यासाठी आर्थिक मदत हवी म्हणून अगदी बँकांकडून कर्ज घेतल्याच्या प्रकरणांबद्दल समजल्यानंतर हे विधेयक सादर करण्याची कल्पना सुचली असं जसबीर सिंग गिल यांनी सांगितलं. लग्नांवर होणाऱ्या वायफळ खर्चांवर निर्बंध घालून मुलींची भ्रूण हत्या तसेच मुली या कुटुंबावरील ओझं असतात यासारख्या संकल्पना संपुष्टात आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचंही खासदार जसबीर सिंग गिल म्हणाले. हे खासगी विधेयक असून हे मान्य करायचं की नाही याचा निर्णय घेण्याचा हक्क संसदेला असतो.

3 प्रमुख गोष्टी कोणत्या?

हे विधेयक मांडताना काँग्रेसच्या खासदाराने ही संकल्पना आपल्याला 2019 मध्ये फगवाडा येथील लग्नाला हजेरी लावल्यानंतर मिळाल्याचं म्हटलं आहे. या लग्नामध्ये जेवणाचे 285 ट्रे होते. त्यापैकी 129 ट्रेला कोणी हातही लावला नाही असं या खासदाराने सांगितलं. त्यामुळे जेवण मोठ्या प्रमाणात वाया गेलं, असंही या खासदाराने सांगितलं. या विधेयकामध्ये 3 प्रमुख तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये वर आणि वधू दोघांकडील पाहुण्यांची एकूण संख्या 100 पर्यंत मर्यादित असावी, भोजनामध्ये जास्तीत जास्त 10 पदार्थ असावेत आणि भेटवस्तूंची किंमत जास्तीत जास्त 2500 रुपयांपर्यंत असावी या गोष्टींचा समावेश आहे. तसेच महागड्या भेटवस्तू स्वीकारु नये यासंदर्भातील जागृती यामधून करण्यात आली आहे. गरीब, गरजू, अनाथ आणि समाजातील इतर दुर्बल घटकांसाठी किंवा बिगरसरकारी संघटनांसाठी दान करावे याचाही उल्लेख विधेयकामध्ये आहे.

स्वत: करतो याचं पालन

आपण स्वत: आपल्या मुलाचं आणि मुलीचं लग्न लावलं तेव्हा हा नियम पाळल्याचंही काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल यांनी संसदेत सांगितलं. आमच्या घरच्या लग्नांना 30 ते 40 पाहुणेच आले होते असं गिल म्हणाले.