नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४१५ पर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे २३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
कोलकात्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना घडली आहे. ५५ वर्षांच्या एका रुग्णाने सोमवारी शेवटचा श्वास घेतला. दुसरीकडे मुंबईमध्ये कोरोनामुळे फिलिपिन्सच्या ६८ वर्षांच्या माणसाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. आज कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळून आले. कोरोना पीडित रुग्णांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
#WATCH live: Union Health Ministry briefs the media on #Coronavirus, in Delhi, on 23rd March 2020 https://t.co/i6z28EYnLj
— ANI (@ANI) March 23, 2020
महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्फ्यूची घोषणा केली आहे. पंजाबमध्येही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कर्फ्यू लावला आहे.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्या कोशंबी भागताल्या एका डॉक्टरला कोरोना झाला आहे. हा डॉक्टर ३ दिवसांपूर्वी फ्रान्सवरून परत आला आहे. या डॉक्टरला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोरोनामुळे मुंबईमध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमधील कलबुर्गी, बिहारमधील पटना, सुरत, कोलकाता आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली.