दहशतवादाला न जुमानता आजपासून अमरनाथ यात्रेला सुरूवात

जम्मू काश्मीरच्या प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला सुरुवात झालीय. यात्रेकरुंची पहिली तुकडी यात्रेसाठी रवाना झालीय. 

Updated: Jun 29, 2017, 10:28 AM IST
दहशतवादाला न जुमानता आजपासून अमरनाथ यात्रेला सुरूवात title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला सुरुवात झालीय. यात्रेकरुंची पहिली तुकडी यात्रेसाठी रवाना झालीय. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनी यात्रेकरुंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. 3 हजार 880 मीटर उंचीवर स्थित असणा-या अमरनाथची यात्रा 40 दिवस सुरु राहणार आहे.

 यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय. याच पार्श्वभूमीवर यात्रा मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. यात्रा काळात एकूण 24 बचाव दल तैनात करण्‍यात आलेत. यामध्‍ये जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलिस, राज्य आपत्ती निवारण दल आणि राष्ट्रीय आपत्ती मुक्ती दलाच्‍या जवानांचा समावेश आहे. 

अमरनाथच्‍या दर्शनासाठी जाणारे भाविक अनंतनाग जिल्‍ह्याच्‍या परंपरागत 28.2 किमी लांब पहलगाम मार्ग आणि गंदेरबल जिल्‍ह्याच्‍या 9.5 किमी लांब बालटाल मार्गावरुन जाते. 40 दिवसांनंतर सात ऑगस्‍टला ही यात्रा समाप्‍त होईल.