भारतीय लष्करासाठी फेब्रुवारी महिना घातक, अनेक जवानांच्या प्राणाची आहूती

या घटनांमध्ये गमावले वीर जवान 

Updated: Feb 20, 2019, 11:14 AM IST
भारतीय लष्करासाठी फेब्रुवारी महिना घातक, अनेक जवानांच्या प्राणाची आहूती  title=

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात भारतीय सैन्यदलावर एक नजर टाकल्यास लक्षात येत आहे की, गेले  काही दिवस हे लष्करासाठी बरेच आव्हानात्मक ठरले आहेत. विमान दुर्घटना म्हणू नका किंवा मग पुलवामातील आत्मघाती हल्ला म्हणू नका. प्रत्येक घटनेमध्ये काही जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. 

बंगळुरू विमान दुर्घटना-

एअरो इंडिया या कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरु असताना भारतीय वायूदलाच्या दोन विमानांचा अपघात झाला. बंगळुरूच्या येलाहांका हवाई दलाच्या तळावर हवाई कसरतींचा सराव सुरु असतानाच हा अपघात झाला. सूर्यकिरण या हवाई प्रात्यक्षिकं सादर करणाऱ्या विमानांच्या ताफ्यातील दोन  विमानं अचानक खाली कोसळली. विमानं जमिनीवर कोसळण्यापूर्वी वैमानिक विमानातून बाहेर पडले. पण, यामध्ये एका वैमानिकाने त्याचे प्राण गमावले. 

मिराज २००० दुर्घटना-

फेब्रुवारी महिन्यातच मिराज २००० हे लढाऊ विमानही दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ज्यामध्ये स्क्वाड्रल लीडर समीर अबरौल आणि सिद्धार्थ नेगी याचं निधन झालं होतं. राजस्थानच्या पोखरण येथे वायुदलाच्या युद्धाभ्यासापूर्वी मिग २७ दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ज्यामध्ये वैमानिकाचा जीव सतर्कतेमुळे वाचला होता. 

पुलवामा हल्ला-

जम्मू काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारीला एक मोठा आत्मघाती हल्ला घड़वण्यात आला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हा हल्ला घडवण्यात आला. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेला हा हल्ला इतका भीषण स्वरुपाचा होता की यात ४० जवान शहीद झाले. तर अनेक जखमी झाले. 

आयईडी निकामी करताना दुर्घटना-

पुलवामा हल्ल्याच्या नंतर लगेचच दोन दिवसांनी आयईडी निकामी करत असतानाच मेजर चित्रेश सिंह बिश्त यांना वीरमरण आलं. 

पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांशी चकमक-

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत देहरादूनच्या मेजर विभूती शंकर धोंडियाल शहीद झाले. त्यांच्याशिवाय इतरही चार जवान या चकमकीत शहीद झाले. या कारवाईत पुलवामा हल्ल्याचे सुत्रधार मारण्यात आले. एक महिना पूर्ण झालेला नसताना अवघ्या वीस दिवसांमध्ये विविध सुरक्षा दलांतील जवानांच्या प्राणांची आहुती देशाच्या आणि देशवासियांच्या संरक्षणार्थ दिली गेली. त्यामुळे आता यावर सरकारकडून काही कठोर पावलं उचलण्यात येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.