अहमदाबाद : अहमदाबाद इथल्या विशेष न्यायालयाने 2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 38 दोषींना आज फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात 11 जणांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. (2008 Ahmedabad serial bomb blast case)
न्यायालयाने मंगळवारी ४९ जणांना दोषी ठरवलं होतं. 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात एकूण 56 जणांचा मृत्यू झाला होता. तर 200 हून अधिक जखमी झाले होते. गुजरातच्या सर्वात मोठ्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी 28 जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. तब्बल 14 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे.
28 आरोपी निर्दोष
न्यायालयाने या प्रकरणात 49 जणांना दोषी ठरवलं होतं तर इतर 28 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. 13 वर्षांहून अधिक जुन्या खटल्यात न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये खटल्याची कार्यवाही पूर्ण केली होती. 2002 च्या गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने हे हल्ले केले होते.
साखळी बॉम्बस्फोटाने हादरलं अहमदाबाद शहर
26 जुलै 2008 रोजी अहमदाबाद 70 मिनिटांत तब्बल 21 बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. 2002 च्या गुजरात दंगलीचा (गोध्रा हत्याकांड) बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी हे हल्ले केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
78 आरोपींवर खटला
अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनीच पोलिसांनी सुरतच्या विविध भागातून अनेक स्फोटकं जप्त केली होती. यानंतर अहमदाबादमध्ये 20 आणि सुरतमध्ये 15 एफआयआर नोंदवण्यात आले. न्यायालयाने सर्व 35 एफआयआर एकत्रित केल्यानंतर डिसेंबर 2009 मध्ये 78 आरोपींविरुद्ध खटला सुरू झाला.