2000 Rupee Note Ban : 2000 रुपयांची नोट मागे घेण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले. आता करायचं काय? असा सगळ्यांनच प्रश्न पडला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. आता बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया 23 मेपासून म्हणजेच आजपासून सुरु होत आहे. जर तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन नोट बदलू शकता. किंवा तुम्ही त्या खात्यातही जमा करू शकता. एबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक दिवस अगोदर लोकांना नोटा बदलण्याची घाई करु नका असे आवाहन केले आहे. 2000 रुपयांची नोट वैध असून पुढील चार महिन्यांत ती कधीही बदलता येईल.
भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) 2000 रुपयांची नोट मागे घेण्याची घोषणा करताना, 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जाऊन वैध चलन बदलता येईल, असे स्पष्ट केले आहे. तुम्ही ते खात्यातही जमा करु शकता. एका वेळी फक्त 10 नोटा बदलता येतील. आरबीआयने आदेशात असेही म्हटले आहे की 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेतली जात आहे. मात्र, तुम्ही या नोटा देऊन खरेदीही करु शकता.
बँकेतून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही पैशाची गरज भासणार नाही, असे आरबीआयने आधीच स्पष्ट केले आहे. तुम्ही बँकेत जाऊन कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुमच्या 10 नोटा एकावेळी बदलू शकता. बँक कर्मचारी किंवा अधिकारी यांच्य वतीने तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या फीची मागणी करता येणार नाही. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.
बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुमच्याकडे असलेल्या सर्व नोटा तुम्ही तुमच्या बँक खात्यात जमा करु शकता. बँकिंग नियमांनुसार, तुम्हाला 50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम ठेवल्यावर पॅन-आधार कार्ड दाखवावे लागेल. याशिवाय पैसे जमा करताना आयकराचे नियम लक्षात ठेवा. जास्त पैसे जमा केल्यावर तुम्हाला आयकर नोटीस मिळेल.
पैसे बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र देण्याची गरज नाही. नोटा बदलून घेण्यासाठी ओळखपत्राची गरज नाही, असे स्पष्ट निर्देशही सोमवारी आरबीआय गव्हर्नरकडून देण्यात आले. काही बँकांनी अशा ग्राहकांसाठी ओळखपत्राची तरतूद केली आहे ज्यांचे त्या बँकेत खाते नाही.
जर तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा जमा करु शकत नसाल तर या नोटा अवैध होतील असे नाही. मात्र त्यानंतर तुमच्या नोटा बँकेत बदलता येणार नाहीत. 30 सप्टेंबरनंतर तुम्हाला नोटा बदलण्यासाठी आरबीआय कार्यालयात जावे लागेल. मात्र, याबाबत आरबीआयकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत आधीच सांगितले आहे. ते म्हणाले की 2000 ची नोट चलनातून मागे घेतल्याने अर्थव्यवस्थेवर फारच मर्यादित परिणाम होईल. ते म्हणाले की, या नोटा चलनात असलेल्या एकूण चलनाच्या केवळ 10.8 टक्के आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत बहुतांश नोटा परत येण्याची शक्यता आहे.
याबाबत आरबीआय गव्हर्नर यांना विचारले असता ते म्हणाले की, 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्याचा मुद्दा केवळ अट्टाहास आहे. ते म्हणाले, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही. बँकांनी वृद्ध आणि दिव्यांगांसाठी नोटा बदलून घेण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.