मुंबई : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूचा नवीन प्रकार 'ओमिक्रॉन व्हेरिएंट'च्या (Omicron) धोक्याच्या दरम्यान, कर्नाटकातून एक वाईट बातमी आली आहे. कर्नाटकात (Karnatak) परदेशातून येणाऱ्या प्रवाशांपैकी दोन दक्षिण आफ्रिकन (African ) नागरिकांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह (Corona Virus) आला आहे. या बातमीने कर्नाटकसह संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. दोन्ही बाधितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
बंगळुरू (Bangluru) ग्रामीण क्षेत्राचे उपायुक्त के श्रीनिवास यांनी शनिवारी सांगितले की, 'कोरोना रिपोर्टवरुन हे स्पष्ट होईल की दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांना कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनची (Omicron) लागण झाली आहे की नाही. हा रिपोर्ट येण्यासाठी 48 तास लागतील.'
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शनिवारी आग्नेय आशिया खंडातील देशांना कोरोना विषाणूच्या संसर्गाचे नवीन प्रकार आढळून आल्याने आणि अनेक ठिकाणी संसर्गाची प्रकरणे वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कता वाढविण्यास आणि सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक उपाययोजना मजबूत करण्यास सांगितले आहे. सण आणि उत्सवांमध्ये सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रासाठी डब्ल्यूएचओच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग म्हणाल्या, "कोणत्याही परिस्थितीत दक्षता कमी करू नये." जगातील इतर देशांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे वाढली आहे. या नवीन व्हायरसची जोखीम आणि व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे.
सिंग म्हणाल्या की, 'देशांनी दक्षता वाढवली पाहिजे. नवीन व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वसमावेशक आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य सेवा आणि उपाययोजना सुरू ठेवल्या पाहिजेत. कोविड-19 जितका जास्त पसरेल, तितका जास्त व्हायरसला स्वरूप बदलण्याची संधी मिळेल आणि जागतिक महामारी तितकी जास्त काळ टिकेल.'