काँग्रेस आमदाराच्या घरात १८ जणांना कोरोनाची लागण

आमदाराचं घर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. 

Updated: Jun 23, 2020, 03:33 PM IST
काँग्रेस आमदाराच्या घरात १८ जणांना कोरोनाची लागण title=

राजस्थान : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात आता राजस्थानमधील आमदाराचं घर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. काँग्रेसचे आमदार गिरीराज मलिंगा यांच्या घरात १८ जणांना  कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गिरीराज मलिंगा धौलपूरच्या बारी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सोमवारी त्यांच्या घरातील ६ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्याआधी १२ जणांना  कोरोना या धोकादायक विषाणूची लागण झाल्याचे लक्षात आले होते. 

कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये त्यांच्या पत्नीचा देखील समावेश आहे. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतण्याला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अकडेवारीनुसार देशात कोरोना रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजार २१५ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत २ लाख ४८ हजार १९० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून देशात १ लाख ७८ हजार १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १४ हजार ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे

गेल्या २४ तासांत देशात ३१२ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर १४ हजार ९३३ नवे रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.