शिमला : शिमला शहराशेजारीच असलेल्या धल्ली परिसरात एका १२ वर्षीय मुलाने पाच वर्षीय मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचं वृत्त समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी घडली आहे. पीडित मुलीसोबत तिच्या आई-वडीलांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी आपल्या घराबाहेर खेळत होती त्यावेळी आरोपीने तिला आमिष दाखवत तेथून नेलं. त्यानंतर तिच्यावर कथित स्वरुपात लैंगिक छळ केला.
पीडित मुलगी ही एका नेपाळी दाम्पत्याची असून ते मजदूरीचं काम करतात. तर, आरोपी हा घर मालकाचा मुलगा आहे.
मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी हरियाणातील हिस्सारमधील उकलाना गावात एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर, शनिवारी एका मुलीवर बलात्कार करुन त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.