चंदीगड : चंदीगडच्या सरकारी रूग्णालयात दहा वर्षाच्या मुलीने एका बाळाला जन्म दिला. ही मुलगी एका नराधमाच्या अत्याचाराची बळी ठरली होती.
रूग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि तिचे बाळ दोघेही सुरक्षीत आहेत. बाळाचे वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, डॉक्टरांचे एक पथक बाळावर लक्ष ठेऊन आहे. पीडित मुलीला सेक्टर ३२मधील सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पीटलमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. पीडितेची प्रसूती सिजेरियन सर्जरीद्वारे करण्यात आली.
दरम्यान, पीडितेचा गर्भापात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अनुमती मागितली होती. मात्र, पीडितेच्या जीवीताला गर्भापातामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. मुख्य न्यायाधीश जे एस खेहर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने मेडिकल बोर्डाचा रिपोर्ट आल्यावर हा निर्णय दिला होता.