Meaning Of too Much Yawning: रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतर दुसरा दिवस आनंदात जातो, असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येकजण पुरेशी झोप व्हावी, यासाठी प्रयत्नशील असतो. पण अनेकदा थकवा आणि तणावामुळे पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर संपूर्ण दिवस मगरगळलेल्या अवस्थेत जातो. त्यामुळे काम करताना वारंवार जांभई येते. तोंड पूर्ण उघडून जोराने हवा आत घेणे व त्यानंतर लगेचच बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला जांभई म्हणतात. जांभई येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे अनेकदा ओरडा खावा लागतो किंवा चेष्टा केली जाते. काही लोक विचित्र पद्धतीने जांभई देतात. जांभई येण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना! मनुष्य सोडा इतर प्राणीदेखील जांभई देतात. जांभई देण्यामागे एक अतिशय रंजक शास्त्र आहे, जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
आपल्या शरीरात घडणाऱ्या प्रत्येक क्रियेमागे मेंदूची भूमिका असते हे तुम्हाला माहीत असेलच. कामाच्या दरम्यान जांभई देणे तुमच्या मेंदूचे तापमान सामान्य करण्यासाठी कार्य करते, असं प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या अहवालात म्हटले. काम करताना सामान्यपेक्षा थोडं गरम असं वाटतं. तेव्हा शरीराचे तापमान सामान्य करण्यासही मदत करते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, अॅनिमल बिहेवियर नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांची जांभई जास्त वेळ येते, त्यांचा मेंदू खूप वेगाने काम करतो.
जांभईवर केलेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की , जांभईमुळे अनेकदा संसर्ग पसरतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला जांभई येते तेव्हा तोंडावर रुमाल ठेवा. 2004 मध्ये, म्युनिकमधील मानसोपचार युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, लोक थंडीच्या काळात सर्वात जास्त जांभई देतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कोणी तुमच्यासमोर जांभई दिली आपल्याला जांभई येऊ लागते.