मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने B.1.1529 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे. इतकंच नाही तर WHO ने आफ्रिकेतील बोत्सवानात प्रथम आढळलेल्या या प्रकाराला ओमिक्रॉन (Omicron) असं नाव दिलं आहे.
WHOने यासंदर्भात निवेदन जारी केलंय. जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कोरोनावरील तांत्रिक सल्लागार गटाची बैठक झाली. यामध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट B.1.1.529 वर चर्चा करण्यात आली. यादरम्यान, गटाने व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित करण्याचा सल्ला दिला. डब्ल्यूएचओने कोरोनाच्या इतर प्रकारांप्रमाणेच याचं नाव 'ओमिक्रॉन' ठेवलं आहे.
24 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत कोरोना B.1.1.529 चे नवीन व्हेरिएंट आढळून आला. डब्ल्यूएचओने सांगितलं की, दक्षिण आफ्रिकेत B.1.1.529 प्रकार उघडकीस आल्यानंतर संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत येत असलेल्या बातम्यांदरम्यान, अमेरिका आणि युरोपीय देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर आफ्रिका आणि आसपासच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केलं जातंय.
दुसरीकडे, बायडेन प्रशासनानेही सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेला उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडानेही गेल्या 14 दिवसांत आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्यांना क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे.