WHN कडून Monkeypox मुळे महामारी घोषित; यामुळे धोका कायम, जाणून घ्या माहिती

WHN सह-संस्थापक यानिर बार-यम म्हणाले की, मंकीपॉक्स साथीचा रोग 2022 च्या शेवटापर्यंत वाढू शकतो.

Updated: Jun 23, 2022, 05:15 PM IST
WHN कडून Monkeypox मुळे महामारी घोषित; यामुळे धोका कायम, जाणून घ्या माहिती title=

मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीबरोबरच मंकीपॉक्सचा प्रादुर्भावही सुरूच आहे. हा धोकादायक विषाणू जगभरातील 58 देशांमध्ये पसरला आहे आणि आतापर्यंत सुमारे 3,417 पुष्टी झालेली प्रकरणे आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य नेटवर्कने (WHN) मंकीपॉक्सला साथीचा रोग घोषित केला आहे. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वेगाने, अनेक खंडांमध्ये पसरत आहे आणि जागतिक कारवाईशिवाय थांबणार नाही, असे एका निवेदनात म्हटले आहे.

डब्लूएचएनने म्हटले आहे की मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित करण्याचा उद्देश हा आहे की जगभरातील देशांनी यापासून होणारे नुकसान थांबवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. चेचकांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असले तरी, त्याचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास लाखो लोक मृत्युमुखी पडतील आणि अनेक अंध आणि अपंग होतील, असेही संस्थेने म्हटले आहे.

WHN सह-संस्थापक यानिर बार-यम म्हणाले की, मंकीपॉक्स साथीचा रोग 2022 च्या शेवटापर्यंत वाढू शकतो, त्यामुळे यासाठी आपण वाट पाहू शकत नाही, तर यावर एक्शन घेण्याची गरज आहे. कारण यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. इथे संस्थेने WHO ला मंकीपॉक्सला गांभीर्याने घेण्याचे सुचवले आहे.

सध्या मंकीपॉक्सचा विषाणू जवळपास 58 देशांमध्ये पसरला असून आतापर्यंत 3,417 लोकांना त्याची लागण झाली आहे. याचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?
मंकीपॉक्स हा मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गामुळे होणारा दुर्मिळ आजार आहे. मंकीपॉक्स विषाणू पॉक्सविरिडे कुटुंबातील ऑर्थोपॉक्स विषाणू वंशातील आहे.

CDC नुसार, मानवांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे स्मॉलपॉक्सच्या लक्षणांसारखीच असतात, परंतु ते सौम्य असतात आणि संसर्ग झाल्यानंतर 7-14 दिवसांनी ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा येतो. सामान्य लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा येणे आणि लसिका ग्रंथी सुजणे यांचा समावेश होतो.

मंकीपॉक्समुळे मृत्यू होतो का?

हा विषाणू जगभरातील अनेक देशांमध्ये गेला असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या प्रादुर्भावामुळे आजपर्यंत एकाचाही मृत्यू झालेला नाही. तथापि, मंकीपॉक्समुळे इतर घातक समस्या (गुंतागुंत) होऊ शकतात जसे की, न्यूमोनिया आणि मेंदूचे संक्रमण किंवा डोळ्यांना त्रास होणे इत्यादी.

मंकीपॉक्स टाळण्याचे मार्ग

CDC ने मंकीपॉक्स टाळण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत जसे की संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळा, आजारी प्राणी आणि मानव यांच्यापासून अंतर ठेवा, संक्रमित रुग्णांना स्वतंत्र खोलीत ठेवा, स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या आणि नेहमी PPE कीटचा वापर करा.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)