Joint pain : थंडीत जसजसं तापमान कमी होते, तसतसा हवेचा दाब ही कमी होत जातो. हा कमी झालेला दाब शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतो. थंड हवामान संधिवात संबंधित तक्रारी आणि वेदना वाढवू शकते. संधिवात आणि सांध्यांसबंधी इतर समस्या असलेल्या व्यक्ती बॅरोमेट्रिक दाबातील चढउतारांबद्दल अधिक संवेदनशील असू शकतात.
हिवाळ्यामुळे संधिवात होत नसला तरी संधिवाताच्या वेदनांमध्ये वाढ होते. हिवाळ्यात संधिवाताचा त्रास वाढण्यामागे अनेक कारणं असतात. परंतु, आहार-विहारात योग्य बदल केला तर या आजारामुळे हिवाळ्यात जाणवणारा त्रास नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
मुंबईतील ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. प्रमोद भोर यांनी हिवाळ्यात सांधेदुखीवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत.
डॉ. प्रमोद भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यातील उबदार कपडे घालणे आणि तुमचे शरीर उबदार राखण्याचा प्रयत्न करा. वेगाने चालणे किंवा व्यायामशाळेत व्यायाम करणे यासारख्या व्यायामामुळे चयापचय क्षमता वाढू शकते. फळे, भाज्या, मासे, सुकामेवा आणि बिया यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे योग्य राहिल. व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतात.
नियमित हलक्या स्ट्रेचिंगमुळे सांध्याची हालचाल सुधारते आणि संधिवाताशी संबंधित वेदना आणि ताठरता कमी होतो. संधिवात व्यवस्थापित करण्यासाठी योग्य शारीरिक मुद्रा राखणे आणि वजन नियंत्रित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. धावणे, उडी मारणे, एरोबिक्स अशा शरीरावर अतिरिक्त ताण पडणाऱ्या क्रियाकलापांपासून दूर रहा. धूम्रपान टाळणे गरजेचे आहे कारण यामुळे ऊतींवर ताण येऊ शकतो, संधिवातासंबंधी अस्वस्थता वाढू शकते, असंही डॉ. भोर यांनी सांगितलंय.
हिवाळ्यात कोणत्याही स्वरुपाची हालचाल करताना आपल्या सांध्यांची विशेष काळजी घ्यावी. योग्य पद्धतीने उभं राहिल्याने आणि चालल्याने सांधेदुखी कमी होऊ शकते. याशिवाय वजन वाढणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. वजन वाढल्याने शरीराचा सर्व भार गुडघ्यांवर येतो आणि वेदना वाढतात. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करावा.