मुंबई : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणं भारतात वाढताना दिसतायत. या व्हेरिएंटचा धोका निर्माण टाळण्यासाठी आता अमेरिकेची लस निर्माता कंपनी Pfizer आणि जर्मनीची BioNTech यांनी मिळून एक नवी लस तयार केली आहे. Pfizer आणि BioNtech यांनी या लसीच्या क्लिनिकल चाचण्याही सुरू केल्या आहेत.
या ट्रायल्समध्ये, 55 वर्षांच्या प्रौढ व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरस लसीच्या रोगप्रतिकारक क्षमतेची तपासणी केली जाईल. यासोबतच ही लस किती सुरक्षित आहे की नाही हे देखील पाहिलं जाणार आहे.
फायझरचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी यापूर्वी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, कंपनी मार्चपर्यंत ही लस देण्याच्या मंजुरीसाठी अर्ज करू शकते.
हा अभ्यास तीन ग्रुप्समध्ये केला जाणार आहे. यामध्ये पहिल्यांदा ज्यांनी 90-180 दिवसांपूर्वी Pfizer-BioNTech च्या कोविड लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांना या ओमायक्रॉन प्रतिबंधक लसीचे एक किंवा दोन डोस दिले जातील.
दुसऱ्या ग्रुपमध्ये, 90-180 दिवसांपूर्वी सध्याच्या लसीचे तीन डोस घेतलेल्यांचा समावेश केला असून जुनी लस किंवा ओमायक्रॉन लसीचा दुसरा शॉट दिला जाईल.
तिसर्या आणि शेवटच्या ग्रुपमध्ये, ज्यांनी यापूर्वी कधीही कोरोनाची लस घेतली नाही अशा लोकांचा समावेश करण्यात येणार असून त्यांना ओमायक्रॉनसाठी बनवलेल्या लसीचे तीन डोस दिले जातील.
कंपनीतील संशोधनाच्या अध्यक्षा कॅथरीन जेन्सेन यांनी सांगितले की, "सध्याचा डेटा असं सांगतो की, कोविड 19 लसीचा सध्याचा बूस्टर डोस ओमिक्रॉनच्या अनेक दुष्परिणामांपासून वाचवतो. त्यामुळे यासंदर्भात कंपनी अतिशय काळजीपूर्वक काम करतेय."