cancer after nail manicure: नखांची साफसफाई करण्यासाठी आणि त्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी मॅनीक्युअर (manicure) केलं आणि हेच सारं जीवघेणं ठरलं तर? आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे. मात्र खरोखर असा प्रकार एका महिलेबरोबर घडला आहे. मॅनीक्युअर करण्यासाठी गेलेल्या या महिलेला नखांच्या माध्यमातून कॅन्सरच्या एक जीवघेण्या विषाणूचा संसर्ग झाला. अमेरिकेत राहणाऱ्या ग्रेस गार्सिया या महिलेबरोबर हा प्रकार घडला आहे. ग्रेसही मॅनीक्युअर करण्यासाठी गेली असता नेलकटरसारख्या एका छोट्या उपकरणाने तिच्या नखांना योग्य आकार देण्यात आला. त्यानंतर ग्रेसच्या बोटांच्या टोकाची त्वचा लाल पडू लागली आणि तिथली त्वचा निघू लागली. ग्रेसने यासंदर्भातील चाचणी केल्यानंतर तिला त्वचेचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं.
मॅनीक्युअरनंतर आपल्या बोटाला दुखापत झाल्याचं ग्रेसच्या लक्षात आलं. नखाजवळच्या पातळ त्वचेजवळ फोड आल्याचं दिसून आलं. सामान्य फोडीसारखी फोड असेल असं समजून ग्रेसने याकडे दुर्लक्ष केलं. मात्र तीन महिने हा फोड तसाच राहिल्याने ग्रेसला याबद्दल शंका आली आणि तिने वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
ग्रेसने त्वचारोग तज्ज्ञाची भेट घेतली. डॉक्टरांनी या महिलेला बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. बायोप्सीच्या अहवालामध्ये ग्रेसला स्क्वैमस सेल कार्सिनोमाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. हा त्वचेच्या कॅन्सरचा एक प्रकार आहे. ग्रेसवर उपचार करणाऱ्या डॉ. टियो सोलेमानी यांनी या आजारसंदर्भातील माहिती दिली.
ग्रेसला हा संसर्ग ह्यूमन पेपिलोमावायरसमुळे (एचपीव्ही) झाला. मॅनीक्युअरच्या माध्यमातून हा संसर्ग झाल्याची शक्यता टाळता येत नाही असंही सोलेमानी यांनी सांगितलं. एचपीव्हीच्या माध्यमातून होणारा नखांच्या त्वचेजवळचा कॅन्सर हा फार दुर्मिळ असतो. मात्र आता अशाप्रकारे कॅन्सर होण्याचे प्रकार वाढत असल्याचंही सोलेमानी यांनी सांगितलं.