मुंबई : जागतिक कोरोना (Coronavirus) महामारीच्या काळातही क्षयरोग (टीबी) (Tuberculosis) रूग्णांना घरी आवश्यक उपचार देऊन केंद्र आणि राज्य सरकारने केलेले प्रयत्न चांगले आहेत. हे अतिशय महत्त्वाचे होते कारण फुफ्फुसाचा टीबी आणि कोविड -19 हे दोन्ही प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतात. असे असताना क्षयरोगाच्या रुग्णांनी कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक, असे मत रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांनी व्यक्त केले आहे. (TB patients need to take covid vaccination)
देशात कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, टीबी रूग्णांमध्ये (तसेच आरोग्याच्या इतर परिस्थितींसह) लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे डॉ. प्रदीप महाजन म्हणाले. कोविड-19 लसीकरणाचा हेतू कोरोना व्हायरस विरोधात लढण्यास आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे आहे. या लसीच्या दुष्परिणामांबद्दल काही लोकांच्या मनात भीती आहे की, लसीकरणामुळे त्यांच्या पूर्वीची आरोग्याची स्थिती आणखी बिघडू शकते. हे समजून घेणे महत्वाचे आहे की या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो. ज्यामुळे एखादयाला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य बिघडेल. चुकीची माहिती धोकादायक ठरु शकते. म्हणूनच शंका असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वाभाविकच संक्रमणाशी लढण्यासाठी सक्षम असतेच, तरी देखील साथीच्या काळात जेव्हा संसर्गाचे प्रमाण अधिक असते. अशावेळी आपल्या शरीराला त्या संसर्गाशी लढा देण्यासाठी काही प्रमाणात आधाराची गरज असते. विशेषत: क्षयरोगाच्या संदर्भात, रोगास कारणीभूत असणारे जीवाणू फुफ्फुसात संसर्ग निर्माण करतात आणि श्वास घेण्यास जबाबदार असलेल्या पेशी हळूहळू नष्ट करतात. रोगास आवश्यक प्रतिकार करण्याची शक्ती ही लसीकरणाद्वारे नक्कीच मिळू शकते, रोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच रोगाची लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारक्षमता या लसीकरणाद्वारे प्राप्त करता येऊ शकते. त्यामुळे कोरोनात लसीकरण करणे गरजेचे आहे.