मुंबई : थंडीचा सीझन आता सुरू झाला आहे. आपल्याला हे माहित आहे की, थंडीमध्ये लोकांना आरोग्याशी संबंधीत वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. तसेच थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुप्पट असतो. एका संशोधनानुसार, फ्लू झाल्यानंतर एका आठवड्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 6 पटीने वाढू शकतो, त्यामुळे या ऋतूत लोकांनी स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे.
तज्ज्ञांच्या मते, तुमच्या वाईट जीवनशैलीच्या सवयींमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी तुम्हाला त्रास उद्भवतो. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले आहे की जेव्हा आपल्याला थंडीच्या काळात फ्लू होतो तेव्हा आपल्या हृदयावर ताण येतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात श्वसन संक्रमण, विशेषत: इन्फ्लूएंझा आणि हृदयविकाराचा झटका यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आढळून आला. Express.Co.Uk च्या अहवालानुसार, फ्लू झाल्यानंतर एका आठवड्यात हृदयविकाराचा धोका सहा पटीने वाढू शकतो. इन्फ्लूएंझा हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण देतो.
हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक असते. ही स्थिती अशा लोकांमध्ये सर्वात सामान्य आहे ज्यांच्या धमन्या आधीच संकुचित आहेत. सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, कारण तेव्हा तापमान सर्वात कमी असतो.
तज्ज्ञांच्या मते, शरीरात कोणताही संसर्ग झाल्यास, रक्त पंप करण्यासाठी हृदयाची गरज अधिक वाढते, त्यामुळे हृदयावर अधिक दबाव येतो. याशिवाय, गंभीर इन्फ्लूएंझामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. रक्तदाब कमी झाल्याने मायोकार्डियल इस्केमिया होऊ शकतो.
शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक दडपण, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि या ऋतूत होणारे व्हायरल इन्फेक्शन यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो.
(नोट : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)