मुंबई : कमी झोपेमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. कमी झोपेमुळे केवळ आरोग्यच नाही, तर दिनचर्याही बिघडत जाते. परंतु कमी झोपेमुळे हाडंदेखील कमकुवत होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हाडं कमकुवत होण्याचा आणि तुटण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.
न्यूयॉर्कमधील बफेलो यूनिव्हर्सिटीतील एका टीमद्वारे यावर संशोधन करण्यात आलं. यावेळी ११,०८४ पोस्टमेनोपॉजल महिलांवर अभ्यास करण्यात आला. महिला आरोग्य उपक्रमांतर्गत, या सर्व महिला सामिल झाल्या होत्या. यावेळी दररोज पाच तास किंवा त्याहून कमी तास झोप घेणाऱ्या महिलांची तुलना, दररोज रात्री सात ते आठ तास झोपणाऱ्या महिलांशी करण्यात आली.
या अभ्यासातून, पाच तास किंवा त्याहून कमी तास झोप घेणाऱ्या महिलांच्या हाडांची घनता कमी होत असल्याचं समोर आलं. या महिलांच्या हाडांचा कमकुवतपणा आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका २२ टक्के ते ६३ टक्के इतका होता. यावेळी मान, पाठीचा कणा आणि संपूर्ण शरीरातील हाडं कमकुवत दिसून आली.
कमी झोप घेण्याने शरीराला इतरही नुकसान होण्याची शक्यता असते. कमी झोप घेणाऱ्यांना अनेक आजार लवकर बळावत असल्याची शक्यता असते. ज्याचा नकारात्मक परिणाम शरीरात दिसू लागतो. पूर्ण झोप न घेणारे आणि नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपल्या आरोग्याचा विचार करत, दिनचर्येत काही बदल करणं गरजेचं ठरतं.
पुरेशी झोप न घेतल्यामुळे स्तन कॅन्सर होण्याचा धोका असल्याचंही अनेक संशोधनातून सांगण्यात आलं आहे. झोप पूर्ण न झाल्याने मधुमेह, हृदयविकार, मानसिक समस्यांचा धोका असल्याचंही अनेक अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.