मुंबई : राज्यात अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. मुंबईतही रूग्ण सापडत असून तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. दरम्यान संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेकडून प्रयत्न केले जात असताना आता डेंग्यू आणि मलेरियाचं संकट समोर आहे. मुंबईत मलेरियाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र आहे.
मुंबईमध्ये गेल्या 12 दिवसांत मलेरियाचे 210 रूग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूच्या एकूण 85 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मलेरिया आणि डेंग्यू यांच्याबरोबरच लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो, कावीळ तर स्वाईन फ्ल्यूचेही रुग्ण दिसून आल्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.
मुंबई महापालिका कोरोना विरोधात उपाययोजना करत असतानाच जुलैपासून डेंग्यू, मलेरियासह पावसाळी आजारांनी डोकं वर काढलं आहे. मात्र सुदैवाने, पावसाळी आजारांमुळे सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नसल्याची नोंद आहे.
मुंबईत जानेवारी 2021 पासून आतापर्यंत डेंग्यूचे 305 रुग्ण आढळून आले आहे. त्यात 85 रुग्ण या महिन्यातील आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या अहवालानुसार, मुंबईमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मुंबईत डेंग्यूचे 129 रुग्ण आढळले होते.
मुंबईत सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. 1 ते 12 सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे 85 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात ही संख्या 144 पर्यंत पोहोचली होती