ब्लॅक फंगसनंतर आता कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना या गंभीर आजाराचा धोका!

आता कोरोनातून बरं झालेल्या रूग्णांमध्ये अजून एक समस्या दिसून येतेय

Updated: Jul 17, 2021, 08:40 AM IST
ब्लॅक फंगसनंतर आता कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना या गंभीर आजाराचा धोका! title=

मुंबई : कोरोनामुक्त झाल्यानंतरही लोकांना इतर अनेक समस्या दिसून आल्या. यामध्ये ब्लॅक फंगस तसंच व्हाईट फंगसचा समावेश होता. मात्र आता कोरोनातून बरं झालेल्या रूग्णांमध्ये अजून एक समस्या दिसून येतेय ती म्हणजे टीबीची. त्यामुळे आता कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढत असताना सफेद प्लेग म्हणजेच टीबीचा धोका वाढताना दिसतोय.

मध्य प्रदेशामध्ये टीबीच्या रूग्णांची संख्या अचानक वाढलेली दिसून आली. भोपाळच्या हमिदीया रूग्णालयातील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जे रूग्ण नुकतेच कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते अशा अधिकतर रूग्णांमध्ये टीबीची लक्षणं दिसून आली आहेत.

हमीदिया रूग्णालयात दररोज 12 रूग्णांना टीबीची लागण झाल्याचं समोर येतंय. इतकंत नाही तर भोपाळच्या सरकारी टीबी रूग्णालयात गेल्या 15 दिवसांत भर्ती केलेल्या रूग्णांपैकी अधिकतर रूग्णांना कोरोनाची लागणं झाल्याची माहिती आहे. 

यासंदर्भात झी 24 तासशी बोलताना डॉ. ललितकुमार आनंदे म्हणाले की, "टीबीची लागण होणं हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असतं. आणि कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम झाला आहे त्यामुळे कोरोनातून मुक्त झालेल्या रूग्णांना टीबीची लागण होण्यामागे हे कारण असू शकतं." 

डॉ. आनंदे पुढे म्हणाले, "रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यामागे मानसिक ताण हे देखील एक कारण आहे. गेल्या दीड वर्षांत नागरिकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढलं आहे. याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतोय. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की टीबीचा धोका अधिक वाढतो."
  
मध्ये प्रदेशात कोरोनामुक्त रूग्णांना टीबीची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कोरोनातून बरं झालेले रूग्ण आता टीबीने संक्रमित होत असल्याचं लक्षात आलंय. या रूग्णांच्या थूंकीद्वारे त्यांना टीबीची लागण झाल्याचं समजतंय. ही निश्चितच एक गंभीर बाब आहे.