India Richest Doctor: डॉक्टर देवी प्रसाद शेट्टी हे कार्डिअॅक सर्जन म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ आहेत. डॉ. शेट्टी हे नारायण हेल्थ या ब्रॅण्डचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतामधील आरोग्य सेवा ही सर्वसामान्यांना परडवेल अशी असावी याच इच्छेमधून त्यांनी नारायण हेल्थची स्थापना केली. सध्या डॉ. शेट्टी यांच्याकडे भारतातील आघाडीच्या डॉक्टर्सपैकी एक म्हणून पाहिलं जातं.
डॉ. शेट्टी हे प्रसिद्ध कार्डिअॅक सर्जन, कोट्यावधी रुपयांचा उद्योग व्यवसाय करणारे उद्योजक आणि समाजसेवक आहेत. विशेष म्हणजे डॉ. शेट्टी हे मदर तेरेसा यांचेही डॉक्टर होते. सर्वात आधी मदर तेरेसा यांच्याशी 1984 डॉ. शेट्टी यांची भेट झाली. मदर तेरेसा यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यावेळेस डॉ. शेट्टी यांनीच त्यांच्यावर उपचार केले होते. मदर तेरेसा यांना हा हार्ट अटॅक आल्यापासून ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 5 वर्षांमध्ये डॉ. शेट्टी हेच त्यांचे खासगी डॉक्टर होते.
"मदर तेरेसा यांच्या प्रेरणेमुळेच नारायण हृदयालयाची स्थापना केली," असं डॉ. शेट्टी यांनी एका कॉलममध्ये म्हटलं होतं. गरीब आणि गरजू लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही प्रेरणा डॉ. शेट्टी यांना मदर तेरेसांकडून मिळाली. 2001 साली डॉ. शेट्टी यांनी नारायण हृदयालय सुरु केलं. त्यानंतरच यामधून नारायण हेल्थची स्थापना झाली. सध्याच्या घडीला हे देशातील सर्वात मोठ्या मेडिकल सेवांपैकी एक आहे. यामध्ये एकूण 47 हॉस्पीटल्स आणि आरोग्य सेवा देणारी केंद्र आहेत. या सर्व सेवांचं बाजार मूल्य हे 15 हजार कोटींहून अधिक आहे.
डॉ. शेट्टी यांनी आपल्या दिर्घ करिअरमध्ये भारतीय आरोग्य सेवा सुधारण्यासाठी फार महत्त्वाचं आणि तितकेच मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. शेट्टी हे मूळचे कर्नाटकमधील दक्षिण कानडा जिल्ह्यातील आहेत. हृदयावर पहिल्यांदा शस्त्रक्रीया कधी आणि कशी करण्यात आली यासंदर्भातील एक लेख लहानपणी त्यांच्या वाचनात आला. त्यानंतरच त्यांनी लहानपणापासून आपल्याला हृदयरोग तज्ज्ञ व्हायचं आहे अशी खूणगाठ मनाशी बांधली. त्यांनी मेहनत आणि कष्टाच्या जोरावर आपलं हे स्वप्न पूर्ण करुन दाखवलं.
मणिपालमधील कस्तुरबा मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेमध्ये हृदयावरील शस्रक्रीयेसंदर्भात अनुभव घेतला. जगभरातील सर्वोत्तम आरोग्य सेवा कशा पुरवल्या जातात, त्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते यासारख्या गोष्टींचा सखोल अभ्यास डॉ. शेट्टी यांनी केला. आपला सर्व अनुभव आणि ज्ञानाचा वापर आपल्या देशातील लोकांना झाला पाहिजे या हेतूने डॉ. शेट्टी पुन्हा भारतात परतले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अनुभव घेतल्याने डॉ. शेट्टी यांना भारतात आरोग्य सेवेसंदर्भातील पायाभूत सुविधा उभारण्यास फार मदत झाली.
नारायण हेल्थच्या माध्यमातून आता 7 हजारांहून अधिक बेड्स असलेली सेवा पुरवली जाते. नारायण हेल्थच्या अंतर्गत देशभरामध्ये 30 मोठी हॉस्पीटल्स चालवली जातात. कमी किंमतीमध्ये उत्तम, दर्जेदार आणि विश्वासर्हता जपणारी आरोग्य सेवा अशी नारायण हेल्थची ओळख झाली आहे. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील नारायण हेल्थने 2015 साली शेअर बाजारामध्ये आपला आयपीओ आणला. देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक असलेल्या किरण मुझुमदार शॉ यांनी सुद्धा नारायण हेल्थच्या स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
डॉ. शेट्टी यांना त्यांच्या समाज उपयोगी कामासाठी आणि आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासंदर्भात मागील अनेक दशकांपासून केलेल्या सेवेसाठी बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भारतामधील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्म श्री (2004) आणि पद्म विभूषण (2012) सुद्धा डॉ. शेट्टी यांना प्रदान करण्यात आले आहेत. 'टाइम' मॅगझिनने डॉ. शेट्टी यांचा समावेश 'आरोग्य क्षेत्रातील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्ती' या यादीमध्ये केला होता. कर्नाटकमधील आरोग्य सेवांसंदर्भातील यशस्वीनी मोहीमेची रचना करण्याच्या कामातही डॉ. शेट्टी यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे.
डॉ. शेट्टी हे भारतामधील सर्वात श्रीमंत डॉक्टर्सपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.2 बिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चनलानुसार 9800 कोटी रुपये इतकी आहे.