Omicron चा परिणाम नव्या वर्षात दिसून येणार!

कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रभाव नवीन वर्षात दिसायला सुरुवात होईल.

Updated: Dec 5, 2021, 12:38 PM IST
Omicron चा परिणाम नव्या वर्षात दिसून येणार! title=

मुंबई : कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रभाव नवीन वर्षात दिसायला सुरुवात होईल. जानेवारी 2022 च्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला या व्हेरिएंटमुळे संक्रमित लोकांची संख्या पीकवर असेल, असा दावा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर इथल्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक आणि उपसंचालक मनिंदर अग्रवाल यांनी केलाय.

प्रो. मनिंदर अग्रवाल यांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरिएंट जलद पसरण्याची चिन्ह आहेत परंतु तो अधिक प्राणघातक असल्याचं दिसत नाही. हा प्रकार हर्ड इम्यूनिटीला बायपास करण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या प्रसाराची लक्षणं अधिक आहेत. आतापर्यंत तो दक्षिण आफ्रिकेपासून ते जगभरात कोठेही पसरला असेल पण त्याची लक्षणं गंभीर नसून सौम्य प्रमाणात दिसली आहेत.

डेल्टाप्रमाणे प्रभाव होणार नाही

आयआयटी प्रोफेसरच्या संशोधनानुसार, भारतात त्याची तीव्रता कमी असण्याची शक्यता आहे. कारण 80 टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे.

ते पुढे म्हणतात, अशा परिस्थितीत त्याची लाट जरी आली तरी त्याचा परिणाम दुसऱ्या लाटेच्या डेल्टा प्रकारासारखा होणार नाही. प्रो. अग्रवाल यांनी त्यांचे संशोधन पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान प्रसिद्ध केलं होतं. त्यावेळी त्यांची गणना बर्‍याच अंशी बरोबर असल्याचं सिद्ध झालं होतं.

30 देशांमध्ये पोहोचला ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेतून सापडलेला हा व्हेरिएंट जगातील सुमारे 30 देशांमध्ये पोहोचला आहे. भारतातील कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्लीत या व्हेरिएंटची 5 प्रकरणं आढळून आली आहेत. सध्या या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसू लागली असून, त्यांच्यावर योग्य उपचार केले जातायत.