मुंबई : कोरोना आणि त्यावरील लसींवर जगभरात अभ्यास केले जात आहेत. याचदरम्यान दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्सने एक अभ्यास केला आहे. भारतातील जीनोम सिक्वेंसवर करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर आले आहेत. हा अभ्यास खास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाच्या संक्रमणाचा प्रभाव जाणून घेण्यासाठी करण्यात आला होता.
एम्सतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये, लस घेऊनही एप्रिल-मे 2021 मध्ये कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये म्हटलंय की, कोरोनाचा वायरल लोड असून देखील कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.
या अभ्यासात 63 कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी 36 जणांनी लसीचे दोन डोस तर 27 जणांनी एक डोस घेतला होता. त्याचप्रमाणे 10 जणांना कोविशिल्ड तर उर्वरित 53 जणांना कोवॅक्सिन टोचण्याच आली होती. यामध्ये अधिकतर नमुन्यांमध्ये B.1.617.2 सापडलं. एकूण 23 नमुन्यांमध्ये म्हणजेच 63.9 टक्के नमुन्यांमध्ये हे सापडलं. तर चार नमुन्यांमध्ये B.1.617.1 तर एका नमुन्यामध्ये B.1.1.7 वेरिएंट सापडला.
दरम्यान, लस घेतलेल्या आणि 5-7 दिवस सलग ताप असलेल्या सर्व रूग्णांमध्ये कोरोनाचं संक्रमण गंभीर नसल्याचं समोर आलं. या अभ्यासात समावेश करण्यात आलेल्या नागरिकांचं सरासरी वय 37(21-92) होतं. ज्यामध्ये 41 पुरुष आणि 22 महिला असल्याची नोंद आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता.