कॅन्सर संसर्गजन्य आहे? कॅन्सरविषयी असलेले समज-गैरसमज

World Cancer Day: अजूनही लोकांच्या मनात कॅन्सरबाबत गैरसमज दिसून येतात. जाणून घेऊया कॅन्सरबाबत लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजांबाबत.

Updated: Feb 4, 2022, 08:16 AM IST
कॅन्सर संसर्गजन्य आहे? कॅन्सरविषयी असलेले समज-गैरसमज title=

मुंबई : कॅन्सर हा गंभीर आजारांपैकी एक आजार मानला जातो. कॅन्सर झालंय असं म्हटलं तरी रूग्णाच्या पायाखालची जमीन सरकते. विविध प्रकारच्या कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यासाठीच लोकांमध्ये या गंभीर आजाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिन साजरा केला जातो. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते कॅन्सर हा नक्कीच गंभीर आजार आहे. पण जर लोकांना त्याबद्दल योग्य माहिती असेल आणि वेळेत या आजाराचं निदान झालं तर यावर वेळीच मात करणं शक्य आहे. मात्र अजूनही लोकांच्या मनात कॅन्सरबाबत गैरसमज दिसून येतात. जाणून घेऊया कॅन्सरबाबत लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजांबाबत.

कॅन्सर झाला म्हणजे मृत्यू होणार

आरोग्य तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, कॅन्सरबद्दल लोकांमध्ये पसरलेला हा समज खूपच गंभीर आहे. कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका हा आजाराच्या प्रकारावर आणि टप्प्यावर अवलंबून असतो. कॅन्सर निदान आणि उपचार याबाबत तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मोठं काम केलं आहे. लवकर निदान आणि उपचार केल्याने बहुतेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. 

कॅन्सर संसर्गजन्य आहे

कॅन्सरच्या संक्रमणाबाबतही लोकांमध्ये अनेक संभ्रम आहे. बर्‍याचदा लोक कॅन्सरच्या रुग्णांना भेटण्यास किंवा त्यांच्या जवळ येण्यास संकोच करतात. पण लक्षात घेण्याजोगा मुद्दा हा आहे की कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाहीये. कॅन्सर व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो अशी एकमेव परिस्थिती म्हणजे अवयव किंवा ऊतींचे प्रत्यारोपण. 

केस गळणं कॅन्सरचं लक्षण

कॅन्सरच्या रुग्णांचे केस गेलेले तुम्ही पाहिले असतील. या आधारावर केस गळणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं यावर अनेकांचा विश्वास आहे. डॉक्टरांच्या सांगतात, केसगळतीची समस्या फक्त काही केमोथेरपी औषधांशी संबंधित आहे. कॅन्सरच्या उपचारादरम्यान वापरल्या जाणार्‍या पद्धतींमुळे केस गळतात. परंतु केवळ केस गळणं हे कॅन्सरचं लक्षण मानलं जाऊ शकत नाही.