मुंबई : बुधवारी महाराष्ट्रात कोविड-19 च्या 3,260 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय तर आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. या नवीन प्रकरणांमध्ये मुंबईतील 1,648 प्रकरणांचा समावेश आहे. यासह राज्यातील एकूण बाधितांची संख्या 79,45,022 झाली असून मृतांची संख्या 1,47,892 झाली आहे.
राज्यात आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन रुग्णांचा मुंबईत तर रायगडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात BA.5 सब-व्हेरिएंटची सहा नवी प्रकरणं आढळून आली आहेत. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह दर 20 टक्क्यांवर पोहोचला आहे.
सध्या महाराष्ट्रात 24,639 रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 3,533 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने महाराष्ट्रात बरे झालेल्यांची संख्या 77,72,491 झालीये.
महाराष्ट्रातील रिकव्हरी दर 97.83 टक्के असून मृत्यू दर 1.86 टक्के आहे. दरम्यान, अहमदाबादमधून मिळालेल्या वृत्तानुसार, राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, बुधवारी गुजरातमध्ये कोविड-19 चे 407 नवीन रुग्ण आढळले आहेत, जी चार महिन्यांतील सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 12,28,493 झाली आहे.