Sexual Activity मुळे मंकीपॉक्स वेगाने पसरतोय? अभ्यासातून धक्कादायक खुलासा

मंकीपॉक्स शारीरिक संबंधांमुळे पसरतोय? पाहा तज्ज्ञांचा अहवाल काय सांगतो

Updated: Jul 22, 2022, 06:33 PM IST
Sexual Activity मुळे मंकीपॉक्स वेगाने पसरतोय? अभ्यासातून धक्कादायक खुलासा title=

नवी दिल्ली : जगभरात मंकीपॉक्सने खळबळ माजवली असताना देशातही या विषाणूने शिरकाव केला आहे. देशात आतापर्यत 3 मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात हळूहळू मंकीपॉक्सचा धोका वाढत चालला आहे. त्यात आता एका अभ्यासात सेक्श्युअल अ‍ॅक्टीव्हिटीमुळे मंकीपॉक्स वेगाने पसरत असल्याचा दावा केला जात होता. मात्र या दाव्यात किती तथ्य आहे ते तज्ज्ञांचा अहवालातून समजून घेऊयात.  

अहवालात काय?
जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत आधीच चिंता व्यक्त केली होती. त्यात आता मंकीपॉक्सची 95 टक्के प्रकरणे सेक्श्युअल अ‍ॅक्टीव्हिटीमुळे समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये गुरुवारी प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 

41 टक्के एचआयव्ही रूग्ण
लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील नवीन संशोधनात 27 एप्रिल ते 24 जून 2022 दरम्यान 16 देशांमध्ये 528 मंकीपॉक्स संसर्गाचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात 
मंकीपॉक्सचा कसा प्रसार होते व  कोणत्या नागरीकांना हा आजार होतोय, याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये एकूण 98 टक्के संक्रमित लोक समलिंगी किंवा उभयलिंगी पुरुष होते. 41 टक्के संक्रमित रुग्णांना एचआयव्ही होते आणि त्यांचे सरासरी वय 38 वर्षांच्या जवळपास होते, अशी बाब समोर आली आहे.  

तज्ज्ञांचं म्हणण काय? 
मंकीपॉक्स संसर्गावरील संशोधनाचे लेखक जॉन थॉर्नहिल यांनी निवेदनात सांगितले की, मंकीपॉक्स हा लैंगिक संक्रमित संसर्ग नाही आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या जवळच्या शारीरिक संपर्कातून हा संसर्ग होऊ शकतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.  

कोणती काळजी घ्यावी ? 
HIV प्रमाणेच, मंकीपॉक्स देखील असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरू शकतो. अशा परिस्थितीत शारीरिक संबंध बनवताना काळजी घेणे आवश्यक आहे. जर एखाद्याला ताप किंवा फ्लूची लक्षणे असतील तर त्यांच्यापासून दूर रहा. जर शरीरावर पुरळ उठत असेल तर स्वतःला वेगळे करा आणि जोडीदारापासून अंतर ठेवा.