कोरोना अ‍ॅस्पिरीनने बरा होतो? केंद्र सरकार म्हणतंय...

सध्या कोरोनासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज खूप व्हायरल होतोय.

Updated: Sep 9, 2021, 12:38 PM IST
कोरोना अ‍ॅस्पिरीनने बरा होतो? केंद्र सरकार म्हणतंय... title=

मुंबई : कोरोनाच्या महामारी दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या मेसेजचा अक्षरशः पूर आला. याच वेळी, काही लोक हे मेसेज पडताळणी न करता व्हायरल करतात. मात्र नंतर असे मेसेज खोटे असल्याचं सिद्ध होतं.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज खूप व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये असा दावा केला जातोय की, कोविड19 हा विषाणू नाही तर एक बॅक्टेरिया आहे. आणि हा बॅक्टेरिया अॅस्पिरीन या औषधाने ठीक होत असल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान यावर आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

केंद्र सरकारतर्फे हा मेसेज फेक आणि दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. या फॉरवर्ड होणाऱ्या मेसेजबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने लोकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये.

फॉरवर्ड होणाऱ्या या मेसेजमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, कोविडमुळे मरण पावलेल्या व्यक्तीचं शवविच्छेदन सिंगापूरमध्ये झालं. त्यानंतर असं आढळून आले की हा प्रत्यक्षात एक बॅक्टेरिया आहे आणि तो एस्पिरीनसारख्या अँटीकोआगुलंट्सने बरा होऊ शकतो. व्हायरल मेसेजमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणूचा आजार बरा करण्यासाठी एस्पिरीनच्या भूमिकेवर अभ्यास करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे, पीआयबी फॅक्ट चेकने मंगळवारी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "फॉरवर्ड व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये दावा केला आहे की, हा विषाणू नसून बॅक्टेरिया आहे आणि एस्पिरिनसारख्या अँटीकोआगुलंट्सने बरा होऊ शकतो. हा दावा फेक आहे! #COVID19 हा एक विषाणू आहे, जीवाणू नाही. तो अँटीकोआगुलंट्सने बरा होऊ शकत नाही.