मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग सतत वाढताना दिसतोय. आतापर्यंत देशभरात 3.2 करोड लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, याच काळात एक चांगली बातमी आली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये आयसेरा बायोलॉजिकल ही कंपनी कोविड 19च्या नवीन औषधाची चाचणी घेत आहे. ज्यामुळे कोरोना संक्रमित रुग्ण केवळ 90 तासांमध्ये बरे होणार असल्याचं म्हटलं जातंय.
आयसेरा बायोलॉजिकलचं (iSera Biological) कोरोना औषध घोडाच्या अँटीबॉडीजपासून बनवण्यात आलं आहे. जी कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम लक्षणांच्या रूग्णांच्या उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. जर हे औषध सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी झालं, तर हे भारताचं या प्रकारचे पहिले स्वदेशी औषध असेल, जे संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येईल.
अहवालानुसार, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी iSera बायोलॉजिकल दावा केला आहे की, औषध चाचणीचा पहिला टप्पा सुरू आहे. आतापर्यंत जे निकाल आले आहेत ते खूप चांगले आहेत. प्रार्थमिक चाचण्यांमध्ये या औषधाच्या वापरामुळे, कोरोना संक्रमित रुग्णांचा आरटी-पीसीआर अहवाल 72 ते 90 तासांच्या आत निगेटीव्ह येत आहे.
अहवालानुसार, कोरोना विषाणूचं औषध बनवणारी iSera Biologicals ही कंपनी केवळ चार वर्ष जुनी आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देखील कोरोना विरोधी औषध बनवण्यासाठी मदत केली आहे. असा दावा केला जातो की, कंपनीने अँटीबॉडीजची अशी कॉकटेल तयार केलीये ज्यामुळे कोरोनाची सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये संसर्ग पसरण्यापासून रोखू शकतो आणि शरीरात असलेला विषाणूही नष्ट होऊ शकतो.