आग लागल्यानंतर विषारी धूरातून सुरक्षितपणे बाहेर कसे पडाल ?

आग लागल्यानंतर मृत्यू होण्याचं कारण हे आगीत होरपळून होण्यापेक्षा आगीमुळे होणारा धूर, त्यामधील घातक घटक  शरीरात गेल्यास अधिक होतो. 

Updated: Aug 22, 2018, 12:33 PM IST
आग  लागल्यानंतर विषारी धूरातून सुरक्षितपणे  बाहेर कसे पडाल ?  title=

मुंबई : आग लागल्यानंतर मृत्यू होण्याचं कारण हे आगीत होरपळून होण्यापेक्षा आगीमुळे होणारा धूर, त्यामधील घातक घटक  शरीरात गेल्यास अधिक होतो. आज मुंबईत परळमधील क्रिस्टल टॉवरला आग लागली आहे. 12,13 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण  जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत बचावलेल्यांना केईएम रूग्णालयात हलवण्यात आले आहे. 

आग लागल्यानंतर बाहेर कसे पडाल ? 

आग लागल्यानंतर अनेकजण भीतीने अस्वस्थ होतात. अशावेळेस आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दल काम करते मात्र विषारी धूरापासून बचावण्यासाठी तुम्हंला थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. 

1. आग लागल्याची किंवा धोक्याची तुम्हांला चुणूक लागल्यास तात्काळ बाहेर पडा. 

2. बंद खोलीत, वॉश रूममध्ये लपण्यापेक्षा बाहेर पडण्यासाठीचा मार्ग निवडा. 

3. धूरापासून दूर जायचे असल्यास जमिनीवर रांगत रांगत पुढे जाण्याचा प्रयत्न करा. धूर वर जात असल्यास शक्यतो जमिनीच्या जवळ रहा. कारण जमिनीवर घातक धूर कमी प्रमाणात असतो. 

4. धुरातून बाहेर पडावं लागत असेल तर एखादा ओला कपडा नाका, तोंडावर पकडून बाहेर पडा. पाण्यामुळे विषारी गॅस तोंडातून आत जाण्यापासून बचाव होतो.  

5. तुम्ही एखाद्या खोलीत असाल तर दरवाजा बंद ठेवा. धूर आत येणार नाही याची काळजी घ्या. फटदेखील ओल्या कापडने झाकण्याचा प्रयत्न करा. 

6. कपड्यांना आग लागल्यास जमिनीवर लोळा अणि ती बुझवण्याचा प्रयत्न करा. 

कोणी विशेष काळजी घेणं आवश्यक ? 

विषारी गॅस, धूर हा श्वसनाचे आजार असलेल्यांना अत्यंत धोकादायक असतात. त्यामुळे दम्याचे रूग्ण, फुफ्फुसाचे आजार असणारे रूग्ण, हृद्यविकाराचा त्रास असणार्‍या रूग्णांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 

लहान मुलं आणि वयोवृद्धांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.