मुंबई : सध्याचा महिना हा नोकरदारवर्गासाठी अपेक्षापूर्तीचा महिना म्हणून ओळखला जातो. नोकरदार वर्गाच्या एकूण वर्षातील कामाचे फळ याच महिन्याच्या पगारात मिळत असते. अनेकांचा पगार घसघशीत वाढतो तर, अनेकांना शाबासकी म्हणून प्रोमोशनची थाप मिळते. काहींना गलेलठ्ठ बोनस (इन्सेंटीव्ह) मिळतो. पण, काही मंडळी मात्र इथे फारच दुर्दैवी ठरतात. कारण, वर्षभर कठोर मेहनत करूनही कंपनीने त्यांच्याकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नसते. अशा वेळी ही मंडळी नाराज होतात, जॉब सोडायचा किंवा कंपनी बदलण्याचा विचार करतात. अशा लोकांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. जी तुम्हाला अप्रायजलच्या काळात मदत करू शकते.
मनासारखे फळ मिळण्यासाठी कष्टाची तर गरज असतेच. पण, कष्टाचे फळ हे नेहमीच गोड मिळते असे नाही. त्यातही कॉर्पोरेट करंपन्यांमध्ये तर शक्यता कमीच. अशा वेळी तुम्हाला कामासोबतच चमकोगिरीही करता येणे महत्त्वाचे आहे. अर्थात ही चमकोगिरी सर्वांनाच जमते असे नाही. पण, प्रयत्न करायला काय जाते. जसे की, तुम्हालाही अनेकदा हे जाणवले असेल की, बॉसच्या समोर तुमचा सहकारी कारणाशिवाय तुमच्या कामात ढवळाढवळ करत असतो. खरे तर, त्याचे हे वर्तन चुकीचे असते पण, हा प्रकार चमकोगिरीतच मोडतो. चमकोगिरी करताना कधीकधी तुम्हाला कामधंदा सोडून ऑफिसमध्ये चकाट्याही पिटता यायला हव्यात. जेणेकरून तुमच्या पाठीमागे तुमच्या बॉसकडे चांगला रिपोर्ट जाईल. बॉसबद्धल तुम्ही चांगले बोलता हे त्याच्यापर्य़ंत पोहोचवा. याला अनेकदा लांगूलचलन (सभ्य भाषेत) करणे असेही म्हणतात.
तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी प्रेमाणे, आपुलकीने वागता यायला हवे. सहकाऱ्याप्रती नेहमी सहकार्याची भावना ठेवा. त्याच्याशी सौहादपूर्ण स्पर्धा करा. लक्षात ठेवा तुमचे व्यावसायीक आणि व्यक्तिगत संबंध हे वेगळेच रहायला हवेत. मुद्दामहून गॉसीप, राजकारण, गट, तट यात अडकू नका.
तुमच्या साप्ताहिक मीटिंगमध्ये तुमचे मुद्दे प्रभावीपणे मांडा. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते थेट म्हणा. त्यात कोणताही आडपडदा ठेऊ नका. अशा मीटिंगमधून तुमची प्रतीमा घडत असते. जी वर्षाखेरीस कामी येते.
अर्थात, अप्रायजल चांगले होण्यासाठी केवळ इतकेच मुद्दे प्रभावी ठरत नाहीत. त्यासोबत इतरही अनेक मुद्दे प्रभावी ठरतात. पण, आता वेळ बरीच टळून गेली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षासाठी लवकरच सविस्तर माहिती देऊ. तोपर्यंत या गोष्टी तर अंमलात आणा.