Hemoglobin Range By Age: प्रत्येकाच्या शरीरात हिमोग्लोबिन हे असतं आणि एकदा का याचं प्रमाण कमी झालं की, संबंधित व्यक्तीला विविध आरोग्यासंदर्भातील तक्रारींचा सामना करावा लागतो. हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरात आढळणारं एक प्रोटीम आहे. हे हिमोग्लोबिन आपल्या शरीरातील टिश्यूंपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करतं.
आपल्या शरीराच्या टिश्यूंमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन होण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी सामान्य असावी लागते. जर याचं प्रमाण कमी-जास्त झाल्यास ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ लागतो. यामुळे तब्येत खालावण्याची अधिक शक्यता असते.
जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्यास ते अशक्तपणाचे लक्षण असू शकते. आरोग्य चांगले राहण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी वेळोवेळी तपासली गेली पाहिजे. मुख्य म्हणजे, स्त्री आणि पुरुष दोघांच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगळी असते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन किंचित कमी असते. आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी किती असली पाहिजे, हे पाहूया.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या अहवालानुसार, प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन पातळी 14 ते 18g/dL दरम्यान सामान्य मानली जाते. तर प्रौढ महिलांमध्ये, हिमोग्लोबिनची पातळी 12 ते 16g/dL दरम्यान सामान्य मानली जाते. ज्यावेळी शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण सामान्यपेक्षा कमी होतं, त्यावेळी त्या व्यक्तीला अशक्तपणा असल्याचं मानलं जातं.
हिमोग्लोबिन कमी झाल्यास व्यक्ती ॲनिमियाने ग्रस्त असल्याचं समजतं. ॲनिमिया एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरेसा पुरवठा होत नाही. अशा स्थितीत व्यक्तीला खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. अशक्तपणा फारच वाढल्याने हृदय आणि फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी वेळोवेळी त्यांची रक्त तपासणी करून घेतली पाहिजे.
हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी ज्या पदार्थांमध्ये आर्यनचं प्रमाण अधिक असतं, त्यांचं सेवन केलं पाहिजे. आयर्न म्हणजेच लोह हा एक घटक आहे जो हिमोग्लोबिनचे उत्पादन वाढवण्यात फायदेशीर ठरतो. हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी मांस, मासे आणि अंडी सर्वात फायदेशीर मानली जातात. तर शाकाहारी व्यक्तींनी बीन्स, कडधान्ये, हिरव्या भाज्या यांचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं.