मुंबई: विवाह हे अनेकांसाठी सुंदर नात. जे साथ देतं जन्मोजन्मी. पण, हे नातं तयार होताना नात्याची सुरूवात जर सुंदर झाली तर, हे नातं उत्तरोत्तर अधिक बहरत जाते. म्हणूनच अनेक जोडपी प्रामुख्याने हनिमूनला (मधुचंद्र) जाण्याचा पर्याय निवडतात. हा पर्याय निवडण्यामागे काय असते त्यांची मानसिकता....?
काही लोक हे प्रेमविवाह करतात. तर, काही पारंपरीक पद्धतीने नियोजित विवाह (अरेंज मॅरेज) करतात. अर्थात लग्न कोणत्याही पद्धतीने केले तरी, नव्या नात्यात काहीसे अंतर हे असतेच. त्यामुळे नात्यातील ही सूक्ष्म छटा हनिमूनच्या काळात भरून निघण्याच्या संधी अधिक असतात. याच काळात दोघेही एकमेकांना समजून घेतात. एकमेकांच्या विचारांची, स्वभावाची, सवयींची खरी ओळख ही तेथेच होते.
विवाह म्हटलं की, धावपळ ही आलीच. त्यात अविवाहीत असताना अनेक वर्षे केलेली धावपळ अधिक. या सर्व दगदग, धावपळीतून काहीसी विश्रांती मिळावी. आयुष्याची नवी सुरूवात करताना आपली मानसिक आणि शारीरिक स्थितीसुद्धा तंदुरूस्त असावी. यासाठी दैनंदिन कामापासून काहीसा स्वत:ला आणि आपल्या जोडीदाराला वेळ मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे या गरजेतूनही जोडपी हनिमूनला जातात.
लग्नानंतरचे सुरूवातीचे काही दिवस हे अत्यंत रोमॅंटीक मुडचे आसतात. या दिवसातील आठवणी आयुष्यभर पुरतात असा अनेकांचा अनुभव. त्यामुळे याच आठवणी तुम्हाला वृद्धापकाळीही मानसिक हिरवळ दाखवू शकतात. त्यामुळे या आठवणींचा ठेवा समृद्ध करण्यासाठीही जोडपी हनिमूनला प्राधान्य देतात.
विवाहानंतर प्रत्येक जोडप्याला एकांताची गरज असते. हा एकांत मानसिक पातळीपासून शारीरिक पातळपर्यंतचा असतो. या एकांतासाठी वेळ मिळावा यासाठीही जोडपी हनिमूनला जातात.