मुंबई : हिपॅटायटीस- बी ही एक जागतिक पातळीवरील मोठी आरोग्य समस्या आहे. हिपॅटायटीस- बी चा यकृताला होणारा संसर्ग (एचबीव्ही) जीवघेणा ठरूशकतो. लहानपणी हिपॅटायटीस- बी चा संसर्ग झाल्यास हा संसर्ग नंतर दीर्घकालीन ठरण्याचा धोका वाढतो अशी माहिती नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या कन्सल्टंट डॉ. स्नेहा साठे यांनी दिली.
या विषाणूचा संसर्ग अल्पकाळापुरता किंवा दीर्घकाळ टिकणारा असतो. अल्पकालिन संसर्ग सहा महिन्यांपेक्षा कमी काळ टिकतो. प्रौढपणी झालेला संसर्ग बहुतांशी अल्पकालीन असतो. कधी कधी अल्पकालीन संसर्गाचे दीर्घकालीन संसर्गात रूपांतर होते.
दीर्घकाळ टिकणारा संसर्ग हा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकतो. हिपॅटायटीस- बीचा संसर्ग काही बाबतीत दीर्घकाळ रेंगाळण्याचे कारण त्याच्याविरुद्ध रोग्याची प्रतिकारशक्ती कमी पडते. हा संसर्ग पुढे आयुष्यभर टिकला तर त्यामुळे सिर्र्होसीस आणि यकृताचा कर्करोग यासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.
जगभरात, २५ कोटीहून अधिक लोक हिपॅटायटीस- बी च्या दीर्घकालीन संसर्गाने संक्रमित झाले आहेत, ज्याला हिपॅटायटीस-बी सरफेसअँटीजेन पॉझिटिव्ह असे म्हणतात. सामान्य लोकांमध्ये हिपॅटायटीस- बी संसर्गाबाबत जागरुकतेचा अभाव असल्याचे दिसून येते. डब्ल्यूएचओच्या २०१६मधील पाहणीनुसार एकूण संक्रमित लोकांपैकी २७ दशलक्ष (१०.५%) लोकांना आपल्याला संसर्ग झाल्याची माहिती होती, तर ४५ दशलक्ष लोकांना(१६.७%) उपचारादरम्यान आपल्याला हिपॅटायटीस-बी असल्याचे कळले.
हिपॅटायटीस- बी हा संक्रमित व्यक्तीच्या रक्त, वीर्य किंवा शरीराच्या इतर द्रवांच्या संपर्कातून पसरतो. एखाद्या महिलेस हेपेटायटीस बी संसर्ग असल्यास, तिच्या संसर्गजन्य स्थितीनुसार, गर्भावस्थेदरम्यान, प्रसूतीच्या वेळेस किंवा स्तनपानाद्वारे बाळाला संसर्ग होण्याचा धोका असतो.पैकी प्रसूतीच्यावेळेस संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
पुरुषांमध्ये हिपॅटायटीस- बी चा संसर्ग दीर्घकालीन असल्यास पुरुषाच्या प्रजननक्षमतेवर दुष्परिणामहोऊ शकतो. संक्रमित पुरुषांच्या बाबतीत हिपॅटायटीस-बी विषाणूचा डीएनए शुक्राणूमध्ये प्रविष्ट झाल्याचे आढळते. आणि त्यांच्या वीर्याचे प्रमाण घटते, शुक्राणूंची संख्या घटते तसेच शुक्राणूंची हालचाल कमी होऊन स्वरूपही बदलते.
ज्या जोडप्यांमध्ये केवळ पुरुष जोडीदारास दीर्घकालीन हिपॅटायटीस- बीची लागण झाली आहे, तेथे स्त्री जोडीदाराला लसीकरणाने संक्रमित होण्याचा धोका कमी करता येतो. जेणेंकरून गर्भावस्थेत बाळामध्येही संक्रमणाचाधोका कमी होतो. मूल होण्यासाठी उपचार घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांच्या बाबतीत हिपॅटायटीस -बी, हिपॅटायटीस -सी आणि एचआयव्हीसारख्याविषाणूजन्य आजाराची तपासणी उपचार सुरु करण्यापूर्वी करणे गरजेचे आहे.
जर जोडीदार हेपेटायटीस- बी पॉझिटिव्ह असल्याचे आढळले तर संक्रमणाची स्थिती (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार) तपासून घेतली पाहिजे आणि संक्रमित नसलेल्या जोडीदाराचे लसीकरण आणि पुढीलकार्यवाहीचा निर्णय घेण्यासाठी प्रजनन तज्ञाकडून सल्ला घेणे गरजेचे आहे.