Paper Cups Safer Than Plastic : आपल्या देशात चहाप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. घराबाहेर असल्यावर चहाच्या टपरीवर किंवा हॉटेलमध्ये जाऊन चहाची तलफ भागवली जाते. चहाच्या स्टॉलवर काचेचे छोटे ग्लास किंवा कपातून चहा दिला जातो. पण हे काचेचे ग्लास किंवा कप अनेक जण वापरत असल्याने काही जणं पेपर कपमधून (Paper Cup) चहा पिणं पसंत करतात. पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याला हानिकारक ठरत असल्याने प्लास्टिक प्लास्टिक कपवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. याला पर्याय म्हणून पेपर कपच्या वापराला सुरुवात झाली.
IIT च्या अभ्यासात धक्कादायक खुलासा
पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी (IIT) खरगपूरने केलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. प्लास्टिक कपमधून चहा पिण्या इतकंच डिस्पोजेबल पेपर कपमधून पिणं हानिकारक असल्याचं या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जे कप एका वापरानंतर फेकले जातात, त्यात प्लॅस्टिकचं प्रमाण असतं, उष्णतेच्या संपर्कात आल्यावर त्यातून रसायनं (Chemicals) बाहेर पडतात आणि ते चहात मिसळतात.
अभ्यासाचा उद्देश
डिस्पोजेबल पेपर कपमधील चहा किंवा इतर गरम पेयाच्या संपर्कामुळे कपात असलेल्या प्लास्टिकची गळती होते की नाही हे समजून घेणं, हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश होता. या अभ्यासात वेगवेगळ्या प्रकारचे पेपर कपचा समावेश करण्यात आला. या कपमध्ये किती प्रमाणात प्लास्टिकची मात्रा आहे याचा तपास करण्यात आला.
कपमधील प्लास्टिकची गळती
डिस्पोजेबल पेपर कपला आतून एका प्रकारचा प्लास्टिक थर दिलेला असतो. ज्यामुळे कप वॉटरप्रुफ होतो. अशात जेव्हा गरम चहा किंवा एखादं गरम पेयं आपण कपमध्ये ओततो, त्यावेळी हळू-हळू प्लास्टिकची गळती होते, ज्यामुळे गरम चहामध्ये मायक्रोप्लास्टिक मिसळलं जातं.
15 मिनिटात चहाचं विष
पेपर कपमध्ये गरम चहा किंवा कॉफी प्यायला साधारणत: 15 मिनिटांचा अवधी लागतो. यादरम्यान कपच्या आतील मायक्रोप्लास्टिकचा थर खराब होतो आणि गरम पेयांमध्ये 25,000 मायक्रॉन आकाराचे कण जमा होतात. असंही अभ्यासातून समोर आलं आहे.
मायक्रोप्लास्टिक आरोग्यासाठी धोकादायक?
मायक्रोप्लास्टिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. यामुळे हार्मोनल असंतुलन, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं किंवा विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
(Disclaimer : ही माहिती केवळ तुम्हाला जागरुक करण्यासाठी दिलेली आहे. आयआयटीच्या संशोधनावर ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित काही उपाय करत असाल तर अवलंबण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या)