मुंबई : मधुमेहाचा त्रास जडला की सगळ्यात पहिलं बंधन हे तुमच्या खाण्या-पिण्यावर येते. मधुमेहींनी कोणते पदार्थ खावेत? किती प्रमाणात खावेत यावर रक्तातील साखरेची पातळी अवलंबून असते. अनेकांना मधुमेहींनी अंड खाऊ नये असे वाटते. पण नव्या संशोधनानुसार, मधुमेहींनी आहारात अंड्याचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं असा सल्ला देण्यात आला आहे.
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनने दिलेल्या अहवालानुसार अंड्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रेरॉलच्या प्रमाणावर परिणाम होत नाही. आठवड्याभरात 12 अंडी खाल्ल्याने मधुमेहाचे प्री डायबेटीक आणि टाईप 2 च्या रूग्णामध्ये हृद्याचे आजार जडण्याचा धोका कमी होतो. अंड्यामध्ये कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढेल या भीतीने अंड कमी खावे असा सल्ला दिला जातो.
सिडनी युनिव्हरसिटीच्या निकोलस फुलरच्या म्हणण्यानुसार, मधुमेहींनी अंड खावे का? याबाबत मतभेद असले तरीही त्याचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास कोणताही धोका नाही.
अंड्यातील प्रोटीन आणि इतर पोषक घटक आरोग्याला फायदेशीर ठरतात. आहारात अंड्याचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते. हृद्याचे आरोग्य उत्तम राहते. रक्त वाहिन्यांनादेखील मजबूत करण्यास मदत करतात. गरोदर स्त्रीयांनादेखील अंड खाण्याचा सल्ला दिला जातो.