कोरोनाचं चीनमध्ये थैमान, युरोपमध्ये घमासान! कोरोना रोखण्यासाठी लवकरच चौथा डोस?

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता आरोगतज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे

Updated: Mar 21, 2022, 08:08 PM IST
कोरोनाचं चीनमध्ये थैमान, युरोपमध्ये घमासान! कोरोना रोखण्यासाठी लवकरच चौथा डोस? title=

Corona Update : चीन (China) आणि हाँगकाँगमध्ये (Hongkong) कोरोनाचा नवा व्हेरियंट (Corona New Varient) अतिशय वेगानं पसरतोय. ब्रिटनमध्ये रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यातील बहुतांश रूग्ण हे कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) BA.2 व्हेरियंटचे आहेत. युरोपमध्ये चौथ्या लाटेची (Fourth Wave) भीती व्यक्त होत आहे. 

अशातच अमेरिकेतील (America) प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊसी यांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिलाय. रूग्णांचं प्रमाण असंच वाढत राहिलं तर बुस्टर डोस (Booster Dose) किंवा चौथ्या डोसची (Fourth Vaccination) गरज भासेल असं फाऊसी यांनी म्हंटलं आहे. 
 
ओमयक्रॉनच्या तुलनेत बीए.2 व्हेरियंट 50 ते 60 टक्के अधिक संक्रामक असल्याचा दावा फाऊसी यांनी केला आहे. त्यामुळेच येत्या काळात युरोपात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढेल. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना बुस्टर किंवा चौथा डोस द्यावा लागेल असं फाऊसी यांनी सांगितलंय. 

तर दुसरीकडे फायझर आणि मॉडर्ना या दोन कंपन्यांनी लसीचा चौथा डोस तयार केला असून अमेरिकच्या आरोग्य विभागाकडे मंजुरी मागितली आहे. 
 
कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत युरोपात मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे चौथ्या लाटेला कमी लेखण्याची चूक युरोपियन देश नक्कीच करणार नाहीत. त्यादृष्टीनं अमेरिकन सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. आता संभाव्य धोका ओळखून भारतानेही बुस्टर डोसवर भर देण्याची गरज आहे.