मुंबई : 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' ही म्हण तुम्ही ऐकली असेल. पण उन्हाळा आला की सगळ्यांना या म्हणीचा विसर पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत लोकं रविवार सोडा कोणत्याच दिवशी अंडी खात नाहीत. दरम्यान उन्हाळ्यात अंडी खाणं योग्य की, अयोग्य असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
तर आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात अंडी खाणं फायदेशीर आहे की हानिकारक?
उन्हाळ्यात अंडी न खाण्याचा सल्ला तुम्हाला आतापर्यंत बर्याच लोकांनी दिला असेल, कारण त्यांचा प्रभाव गरम असतो. काही लोक पिंपल आणि पोटाच्या आजारांसाठी अंड्याला दोष देतात. पण तज्ज्ञांच्या मते, यामागे कोणतेही वैज्ञानिक सत्य नाही. उन्हाळ्यात अंडी टाळावीत असा केवळ एक गैरसमज आहे.
अंडी प्रोटीनचा एक स्रोत आहे शिवाय त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन डी, ल्युटीन सारखे आवश्यक अँटिऑक्सिडंट्स असतात. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबतच आपल्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतात. याशिवाय अंडी वजन कमी करण्यासही मदत करतात. सकाळी अंडी खाल्ल्याने जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
यामध्ये काहीही वाद नाही की उन्हाळ्यात अंडी खाणं फायदेशीर आहे. परंतु दररोज 1-2 अंडींपेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. यासोबतच तुम्ही तुमच्या आहारात भरपूर पाणी आणि भाज्या आणि फळांचा समावेश करावा.