दसऱ्यानंतर आपट्याची पाने फेकू नका; आरोग्यासाठी आहेत फायदेशीर, असा करा वापर

Health Benefits Of Apta: आपट्याच्या पानांचे महत्त्व दसऱ्याच्या दिवशी जास्त असते. मात्र, आरोग्यासाठीही आपट्याची पाने गुणकारी आहेत. 

Updated: Oct 26, 2023, 11:16 AM IST
दसऱ्यानंतर आपट्याची पाने फेकू नका; आरोग्यासाठी आहेत फायदेशीर, असा करा वापर title=
dussehra aapta leaves is good for health problems know health benefits in marathi

Health Benefits Of Apta: दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना मोठं महत्त्व असते. आपट्याच्या पानांना सोनं म्हटलं जाते. याच पानांना शमी असेही म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी या पानांची विधिवत पूजा करुन घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांना ही पाने सोनं म्हणून वाटतात. आपल्या आयुष्यातही सोन्यासारखी भरभराट होऊ देत, असा आशीर्वाद दिला जातो. पण दसरा संपल्यानंतर एकतर आपट्याची पाने फेकून दिली जातात किंवा निर्माल्यात देतात. पण तुम्हाला माहितीये का आपट्याच्या पानांचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. 

आपट्याच्या झाडाला संस्कृतमध्ये अश्मंतक असं म्हणतात. तर, या झाडाचे शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा असं या आहे. प्रामुख्याने भारत,श्रीलंका व चीन या देशातील जंगलात ही झाडे आढळून येतात. आपट्याचे झाड हे बहुगुणी आहे. औषध म्हणूनही त्याचा वापर केला जातो. या झाडाच्या सालीपासून दोरखंड बनवतात व खोडातून डिंकही मिळवला जातो. 

- दसऱ्याला पुजण्यासाठी आणलेली आपट्याची पानेनंतर सुकून जातात. पण तरीही त्याचा वापर केला जातो. 4-5 आपट्याची पाने तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळून घ्यावीत. हा एक कप काढा रोज सकाळी उपाशी पोटी घेतल्याने साथीच्या रोगापासून रक्षण होते. 

- आपट्याची पाने पाण्यात उकळवून घेऊन जेवणाच्या आधी हा काढा प्या. यामुळं शरीरातील गाठी विरघळून जातील.

- रोज सकाळी दोन चमचे आपट्याचा रस प्यायल्याने किडनीची विकार दूर होतात

- आठ ते दहा आपट्याची पाने घेऊन स्वच्छ धुवावीत देठ तोडून टाकावा. बारीक तुकडे करून 3 कप पाण्यामध्ये एक होईपर्यंत उकळावे व एक कप झाल्यावर सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपते वेळेस  नियमित प्यावे   श्वसनाचे आजार व कंठरोग दूर होतात

- आपट्याचे पान हे तुरट रसाचे आहे. या पानांचा रस प्यायल्यास पित्त, कफ दोष कमी होतो 

- तळपायाची आग होणे, तोंडाची आग होणे, कोरड पडणे अशा समस्या उद्भवतात अशावेळी आपट्याच्या पानांचा रस पिणे फायद्याचे ठरते. 

- थायरॉईडच्या समस्येवरही आपट्याची पाने गुणकारी आहेत. सर्वप्रथम आपट्याची पाने स्वच्छ धुवून सुकवून ती मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. नंतर हे चूर्ण रोज मधासोबत सेवन करावे. त्यामुळं थायरॉईडची समस्या नियंत्रणात येईल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)