भीतीदायक स्वप्न का पडतात, तुम्हाला माहित आहे?

जाणून घेऊया की आपल्याला भीतीदायक स्वप्न का पडतात.

Updated: Jun 12, 2021, 06:57 PM IST
भीतीदायक स्वप्न का पडतात, तुम्हाला माहित आहे? title=

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला झोप लागल्यानंतर स्वप्न पडतात. यापैकी काही स्वप्न चांगली असतात तर काही स्वप्न ही फार भीतीदायक असतात. भीतीदायक स्वप्नांमुळे आपण झोपेतून लगेच जागे होतो. झोपेतून जागं झाल्यानंतरही पडलेल्या स्वप्नाची थोडीशी भीती मनाला वाटत असते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की भितीदायक स्वप्न आपल्याला का पडतात? तर आजच्या आर्टिकलमधून जाणून घेऊया की आपल्याला भीतीदायक स्वप्न का पडतात.

भीतीदायक स्वप्न का पडतात?

ज्या स्वप्नांना पाहिल्यानंतर आपण उदास होतो किंवा तुम्हाला भीती वाटते त्यांना भीतीदायक स्वप्न म्हणजेत नाईटमेअर म्हटलं जातं. अशी स्वप्न पडणं आपल्या भावना आणि आठवणींना सामोरे जाण्यासाठी मेंदूचा एक प्रतिसाद असू शकतो.

यासंदर्भात सायन रूग्णालयाच्या सायकॅट्री विभागातील असिस्टंट प्रोफेसर डॉ. प्रशांत चौधरी म्हणाले, "व्यक्तीच्या दबलेल्या इच्छा आणि काही गोष्टी स्वप्नांच्या माध्यमातून व्यक्त होतात. अनेकदा लोकांच्या मनात विविध गोष्टींविषयी चिंता असतात. या चिंता आणि ताणतणावामुळे भीतीदायक स्वप्न पडण्याची शक्यता असते."

डॉ. चौधरी पुढे म्हणाले, "काही डिसॉर्डर जसं की, पोस्ट ट्रॉमेटीक स्ट्रेस डिसॉर्डर आणि नाईटमेअर डिसॉर्डर यामुळेही भीतीदायक स्वप्न पडू शकतात. अशा व्यक्ती उपचारांसाठी आल्यानंतर त्यांना औषधं किंवा समुदेशन करण्यात येतं."

आपल्याला स्वप्न का पडतात?

आपल्या झोपेचे अनेक टप्पे असतात. ज्यामध्ये रॅपिड आय मूव्हमेंट एक असतो. या टप्प्यामध्ये व्यक्ती फार गाढ झोपेत असतो. आणि याच कालावधीत स्वप्न पाहण्याची शक्यता अधिक असते. स्वप्नांच्या संबंधात अनेक वैज्ञानिक थियरी आहेत.

एका थियरीच्या माध्यमातून, झोपेत असताना देखील आपलं डोकं सक्रिय असतं. मात्र त्यावेळी त्याच्या लॉजिकल सेंटर ऐवजी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतात. त्यामुळे जीवनातील ज्या भावनात्मक विचारांवर आणि परिस्थितीवर आपण झोपेत नसताना लक्ष देत नाही त्या विचारांशी आणि परिस्थितीशी संबंधित स्वप्न आपल्याला पडतात.