मन एकाग्र आणि शांत ठेवण्यासाठी ५ गोष्टी करा

अनेकदा कठीण परिस्थितीमध्ये मन शांत ठेवणं फार कठीण होऊन जातं. मन शांत असल्यास तुम्ही अनेक गोष्टींवर विजय मिळवू शकतात. तर मग जाणून घ्या मन एकाग्र करण्यासाठी काय केलं पाहिजे.

Updated: Aug 6, 2017, 02:50 PM IST
मन एकाग्र आणि शांत ठेवण्यासाठी ५ गोष्टी करा title=

मुंबई : अनेकदा कठीण परिस्थितीमध्ये मन शांत ठेवणं फार कठीण होऊन जातं. मन शांत असल्यास तुम्ही अनेक गोष्टींवर विजय मिळवू शकतात. तर मग जाणून घ्या मन एकाग्र करण्यासाठी काय केलं पाहिजे.

१)२ मिनिट विचार करा - कठीण परिस्थितीमध्ये २ मिनिट शांतपणे त्या गोष्टीचा विचार करा जे तुम्हाला करावसं वाटतंय. ही गोष्ट केल्याने आणि न केल्याने काय परिणाम होतील याची कल्पना करा. म्हणजे तुमच्यासमोर दोन पर्याय निर्माण होतील. आता काही सेकंद डोळे बंद करा आणि आपलं मन जे काही सांगतं आहे त्याचाच आधार घेऊन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुढे या.

२) नकारात्मक विचार सोडा - अनेक जण नेहमीच नकारात्मक विचार करण्यात खूप वेळ वाया घालवतात. आपल्याला भीती असते की त्या कठीण प्रसंगाचे वाईट परिणाम काय होतील? या विचारामुळे मनात भीती निर्माण होते आणि चित्त थाऱ्यावर राहत नाही. उलट अशा क्षणी आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की या परिस्थिती समोर आपण जिंकलो तर त्याचे किती सुंदर परिणाम दिसून येतील. हा विचार तुमच्या मनात आशा निर्माण करतो आणि तुमचे मन दृढ बनवतो.

3) जबाबदारी घ्या - जर एखादे काम करण्यासाठी तुमची निवड केली असेल तर कठीण प्रसंगी त्याचे अपयश इतरांवर फोडू नका. एक लक्षात ठेवा की इतरांच्या चुका पुढे केल्याने ते लोक पुढल्या वेळेस तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत. जर जबाबबदारी तुमची होती तर ती स्वीकारा म्हणजे त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. 

4) एकाच वेळी एकच काम करा - एकाचवेळी अनेक गोष्टी केल्याने कोणतेही काम नीट होत नाही हे लक्षात ठेवा. एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम हाती घ्या. कठीण प्रसंगी हा नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकाचवेळी अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास कोणत्याही एका कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणजे आधीच वाईट असलेली परिस्थिती अधिकच वाईट होईल.

5) केवळ ध्येय नजरेसमोर ठेवा - कठीण प्रसंगात आपण सामान्यत: आपले ध्येय विसरून जातो. आपण ही गोष्ट नेमकी का करत आहोत याबद्दल आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. एकदा का तुम्ही ध्येयापासून भटकलात की तुमचे मन एकाग्र होणार नाही. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण होईल. सर्वप्रथम मनाला विचारा की आपले ध्येय काय आहे? ते उत्तर मिळाले की त्यानुसार कठीण प्रसंगाशी कसे लढावे या संदर्भात निर्णय घ्या.