Coronavirus: कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटमध्ये बदल झाल्याचा संशय, आठ नमुने पाठवले प्रयोगशाळेत

प्रयोगशाळेत या नमुन्यांचा अहवाल 15 दिवसांनी येईल. त्यानंतरच जर नवीन व्हेरिएंट असेल तर त्याची माहिती मिळण्यास मदत होईल.

Updated: Jul 14, 2022, 06:19 AM IST
Coronavirus: कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटमध्ये बदल झाल्याचा संशय, आठ नमुने पाठवले प्रयोगशाळेत title=

मुंबई : हिमाचल प्रदेशमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं पुन्हा वाढताना दिसतायत. अशातच आता कोरोनाच्या व्हेरिएंटमध्ये बदल होण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. केंद्रीय संशोधन संस्था (सीआरआय) कसौलीमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आठ नमुने जीनोम अभ्यासासाठी दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

दिल्लीतील प्रयोगशाळेत या नमुन्यांचा अहवाल 15 दिवसांनी येईल. त्यानंतरच जर नवीन व्हेरिएंट असेल तर त्याची माहिती मिळण्यास मदत होईल. हे नमुने यादृच्छिक आधारावर पाठविण्यात आले आहेत.

यापूर्वी, 23 मे रोजी जीनोम अभ्यासासाठी पाठवलेल्या नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकाराची पुष्टी झाली होती. आता कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे अजून एक नवीन व्हेरिएंट असल्याची भीती आरोग्य विभागाला वाटत आहे. 

केंद्रीय संशोधन संस्थेने (सीआरआय) पाठवलेल्या आठ नमुन्यांच्या अभ्यासादरम्यान राज्यात कोरोना व्हायरसमध्ये काही बदल झाला आहे का, याची खातरजमा केली जाणार आहे.

दरम्यान तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये BA-4 आणि BA-6 नवीन व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. शिवाय हा व्हायरस देखील वेगाने पसरत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातून नमुने पाठवण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी सोलन डॉ.अमित रंजन तलवार यांनी याला दुजोरा दिला आहे.