Coronavirus do's and don't : ऑफिसमध्ये कसा कराल बचाव?

कोणतं मास्क वापराल? काय करा, काय करु नका...जाणून घ्या डॉक्टरांकडूनच

Updated: Mar 14, 2020, 05:56 PM IST
Coronavirus do's and don't : ऑफिसमध्ये कसा कराल बचाव?  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात मोठं थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळे ५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. या व्हायरसवर अद्याप कोणतंही ठोस असं औषध उपलब्ध नाही. पण, लोकांमध्ये मात्र या व्हायरसबाबत विविध धारणा आहेत. काही लोक नॉनव्हेज खाणं टाळतात, तर कोणी बिना मास्क बाहेर जाणं टाळतंय....पण नक्की हा व्हायरस आहे तरी काय? यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी? याबाबत नोएडा मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील, असोसिऐट डायरेक्टर मेडिसिन डॉक्टर मिनाक्षी जैन यांनी माहिती दिली आहे. 

घाबरु नका -

डॉ. मिनाक्षी यांनी या व्हायरसला घाबरण्याची गरज नसल्याचं सांगितलंय. सर्दी-खोकला झाल्यावर अनेकदा आपल्या शरीरात व्हायरस एन्ट्री करतात आणि नंतर शरीर ठीकही होतं. हादेखील व्हायरसच आहे. पण, हा एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरत असल्याने धोका आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. हा व्हायरस झाल्यानंतर, लगेचच कोणाचाही मृत्यू होत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

डॉक्टरांनी केवळ कच्चं किंवा अर्धवट शिजवलेलं मांस, मटण सेवन न करण्याबाबत सांगितलं आहे. आपल्या देशात मांस, मटण नीट शिजवूनच खाल्ल जात असल्याने या माध्यमातून कोरोना व्हायरस होण्याचा धोका नसल्याचं त्या म्हणाल्या.

कसं असावं मास्क?

डॉ. मिनाक्षी यांनी, संपूर्ण तोंड झाकलं जाईल अशाप्रकारचं मास्क वापरावं असं सांगितलंय. मास्क सैल किंवा लूज असू नये. मास्क तोंडाला पूर्णपणे घट्ट बसेल अशाप्रकारचंच असावं. त्याशिवाय सिजेरियन मास्कचा कोणताही फायदा नसल्याचं त्या म्हणाल्या. ज्या लोकांना सर्दी, खोकला, ताप आहे त्यांनी विशेषकरुन मास्कचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

ऑफिसमध्ये कसा कराल स्वत:चा बचाव?

ऑफिसमध्ये तुम्ही काम करत असलेला डेस्क, मॉनिटर, माऊस, फोन स्वच्छ असणं अत्यावश्यक आहे. ऑफिसमधील एखाद्या सहकाऱ्याला सर्दी-खोकला असल्यास त्याच्याशी दूर राहून बोला. त्यांच्या अधिक जवळ जाऊ नका. कोणाच्याही ताटात जेवू नका. खाण्यापूर्वी, चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. वेळो-वेळी हात स्वच्छ करत राहा. सॅनिटायझर असल्यास त्याचा वापर करा. चेहऱ्याला सतत हात लावू नका. अधिक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.

रोगप्रतिकारशक्ती वाढवा -

रोगप्रतिकारशक्ती उत्तम असल्यास, अशाप्रकारचे व्हायरस आपोआप संपुष्ठात येतात. त्यामुळे इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारशक्ती वाढवणं, ती अधिक स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे. त्यासाठी  चांगलं जेवण करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

काय करा-काय करु नका -

- सॅनिटायझर नसल्यास घाबरु नका. हात वर-खाली, बोटांमध्ये अशाप्रकारे २० सेकंदापर्यंत नीट स्वच्छ करा.
- स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या. ऑफिसमध्ये तुमचा डेस्क साफ ठेवा.
- घरी पोहचल्यानंतर त्वरित हात-पाय स्वच्छ धुवा. हात, तोंड धुतल्याशिवाय कुठेही हात लावू नका. घरभर फिरु नका.
- घरात कोणी आजारी असल्यास त्यापासून शक्यतो लांब राहण्याचा प्रयत्न करा. आजारी व्यक्तीचा टॉवेल, भांडी, कप, इतर वस्तूंचा वापर करु नका.