कोरोना व्हायरस : व्हेंटिलेटर किती महत्त्वाचं

 व्हेंटिलेटर हे असं मशीन आहे जे पेशंटला श्वास घेण्यास मदत करतं. व्हेंटिलेटर आपल्या फुफ्फुसात ऑक्सिजन नेण्यास मदत

Updated: Apr 1, 2020, 06:00 PM IST
 कोरोना व्हायरस  : व्हेंटिलेटर किती महत्त्वाचं title=

मुंबई : व्हेंटिलेटर हे असं मशीन आहे जे पेशंटला श्वास घेण्यास मदत करतं. व्हेंटिलेटर आपल्या फुफ्फुसात ऑक्सिजन नेण्यास मदत करते, तर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्यासही मदत करतं.

सर्जरी करण्याआधी देखील व्हेंटिलेटर वापरलं जातं. पेशंटचं फुफ्फुस जेव्हा अतिशय कमी वेगाने काम करत असेल, तेव्हा व्हेंटिलेटर वापरलं जातं, म्हणून याला लाईफ सेव्हिंग मशीन  देखील म्हणतात

व्हेंटिलेटर सोबत एक नळी देखील जोडलेली असते, ज्यामुळे रुग्णाच्या नाकातून, तोंडातून किंवा गरज भासल्यास गळ्यातून थोडंस कट करून त्या बाजूने शरीरात ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला जातो.

कोविड १९ म्हणजेच कोरोना बाधित रुग्णांना क्रिटिकल केअरची गरज पडते, यात ५ टक्के रुग्णांचा समावेश आहे. अशा रुग्णांना उपचारासाठी अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयूत उपचार करावे लागतात.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे, ८० टक्के रूग्ण हे कोविड-१९ मध्ये हॉस्पिटलमध्ये उपचारांशिवाय बरे होतात. पण सहा पैकी १ पेशंट अतिशय गंभीर असतो, ज्याला श्वास घेण्यास अडचणी येतात.

कोरोना व्हायरसच्या गंभीर रुग्णांच्या फु्फ्फुसांना जास्त बाधा होते. फुफ्फूस मानवाच्या शरीरातील असा भाग आहे, ज्यातून शरीराला ऑक्सिजन पाठवला जातो आणि कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकला जातो.

हा व्हायरस तुमच्या शरीरात प्रवेश करतो. तोंडाकडून श्वास नलिकेकडे जातो आणि यानंतर फुफ्फुसापर्यंत पोहोचतो आणि फुफ्फुसात  लहान लहान एअरसॅक बनवतो. कोरोनाने तयार केलेल्या छोट्या छोट्या एअरसॅकमध्ये पाणी जमा होण्यास सुरूवात होते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्यास सुरूवात होते, यामुळे तुम्ही दीर्घ आणि आरामात श्वास घेऊ शकत नाहीत.

अशा परिस्थितीत रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज पडते. अशावेळी व्हेंटिलेटर फु्फ्फुसात ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतो.  व्हेंटिलेटरमध्ये ह्युमिडीफायर देखील असतं, ज्यामुळे हवेत गरमपणा येतो आणि ओलावा देखील टिकलेला असतो. 

यामुळे शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. मात्र पहिल्या टप्प्यात व्हेंटिलेटरची रुग्णाला गरज नसते, फक्त ज्यांना श्वास घेण्यास अडचण येत आहे, त्यावेळीच व्हेंटिलेटरचा वापर केला जातो.