सरकार घेणार मोठा निर्णय! आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येणार कोरोना लस

कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची DCGI च्या समितीची शिफारस

Updated: Jan 19, 2022, 11:03 PM IST
सरकार घेणार मोठा निर्णय! आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येणार कोरोना लस title=

Corona Vaccination : कोरोना विषाणूविरोधात तयार करण्यात आलेली Covaxin आणि Covishield  लस लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये विक्रीसाठी दिसू शकतात. DCGI च्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीनं (SEC) कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे

SEC ची महत्त्वाची बैठक 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी SEC महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत सहभागी तज्ज्ञांनी कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डच्या मार्केटिंग परवानगीसाठी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं दिलेल्या अर्जांची पडताळणी केली. तसंच, गेल्या वर्षभरात दोन्ही लसींचे परिणाम आणि दुष्परिणाम यावरही चर्चा झाली.

दोन्ही कंपन्यांना तयार करावी लागणार यंत्रणा 
दोन्ही लसीला (Corona Vaccine) भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती. आता लसींच्या आपत्कालीन वापराची अट शिथील करण्यात आली असून खुल्या बाजारात आणण्याच्या निर्णयावर तज्ज्ञांचं एकमत झालं. समितीच्या या निर्णयानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना देशभरातील वितरण व्यवस्था तयार करावी लागणार आहे. त्यानंतर या कंपन्या लस सर्व रुग्णालये आणि मेडिकल स्टोअरमध्ये विक्री करु शकतील.

मेडिकल स्टोअर्समधून लस विकत घेता  येणार
या निर्णयामुळे अद्याप कोणाला लसीचा डोस मिळाला नसेल, तर त्याला रुग्णालयात जाण्याची गरज नाही. तो व्यक्ती जवळच्या मेडिकल स्टोअरमधून लस विकत घेऊन कोणत्याही डॉक्टरकडून ती टोचून घेऊ शकतो. यामुळे देशात लसीकरणाचा वेगही वाढेल आणि सरकारवरील भारही कमी होईल. बाजारात या लसींची किंमत किती असेल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.