आता Booster Dose साठी 9 महिने थांबण्याची गरज नाही, लवकरच...

लवकरच बूस्टर डोस निर्धारित कालावधीच्या अगोदर नागरिकांना घेता येणार आहे.

Updated: Jun 17, 2022, 10:24 AM IST
आता Booster Dose साठी 9 महिने थांबण्याची गरज नाही, लवकरच... title=

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात बूस्टर डोस देण्यात येतायत. अशातच आता बूस्टर डोससंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लवकरच बूस्टर डोस निर्धारित कालावधीच्या अगोदर नागरिकांना घेता येणार आहे. सध्या बूस्टर डोस घेण्याचा कालावधी 9 महिने आहे.

बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्यात आलंय. आता 6 महिन्यात बुस्टर डोस घेता येणं शक्य होणार आहे. या आधी बुस्टरडोससाठी 9 महिन्यांचं अंतर निश्चित करण्यात आलं. मात्र काल राष्ट्रीय लसीकरण सल्लागार गटाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. 

दरम्यान या बैठकीत बुस्टर डोसमधील अंतर 6 महिने करण्यावर सहमती दर्शवली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला शिफारस केली जाणार असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.

राष्ट्रीय सल्लागार समितीच्या पार पडलेल्या बैठकीत, बूस्टर डोससंदर्भात केलेल्या एका अभ्यासावर चर्चा करण्यात आली. वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांचाही आढावा घेतला. 

18 वर्षांवरील सर्व जण ज्यांचा कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, असे व्यक्ती बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना तसंच विद्यार्थ्यांना त्या संबंधित देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 9 महिन्यांच्या कालावधीपूर्वी बूस्टर डोस घेण्याची परवानगी दिलीये.